
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना अन्याय कदापि सहन करणार नाही, भूमिपुत्र कामगारांवर कुणी अन्याय केला तर त्याला तोडून मोडून टाकू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले. आमचे लचके तोडण्याचा वाईट विचार कुणाच्या मनात असेल तर त्याचे राजकारणात कसे तुकडे करायचे ते ठरवावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मुंबई विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱया तुर्कीच्या ‘सेलेबी’ नास कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्याने 3700 कामगारांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले होते. भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला. सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो-थाई कंपनीत सर्व कामगारांना त्याच पगारावर सामावून घेण्यात आले. त्याबद्दल सेलेबीच्या कर्मचाऱ्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.
भगव्याचे तेज कामगारांनी दाखवून दिले
शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो… असा विजय शिवसेनेला नकोय. तुमच्या हृदयातून आलेली ती भावना पाहिजे. जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे? हातामध्ये जो भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचे तेज कामगारांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे, असे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
सावध रहा, कुणकुण लागली तरी कळवा
या विजयावर किंवा आपण जे संकट परतावून लावले त्याच्यावर नुसता भरोसा ठेवून राहू नका, उद्या असेच काहीतरी घडतेय अशी कुणकुण लागली तरी ताबडतोब मला किंवा भारतीय कामगार सेनेला कळवा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगारांना केले.
भाजपनेच सेलेबीला हिंदुस्थानात आणले
बंदी घातल्यावर कळले की, ती तुकाaची होती. आपल्या देशाविरुद्ध जो कोणी असेल त्याच्याकडून आम्हाला भाकरी नकोच आहे. देशाच्या शत्रूकडून आम्हाला काही नकोच आहे. पण सेलेबीला हिंदुस्थानात आणणारी भाजपचीच लोकं होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शत्रू लचके तोडायला गिधाडासारखा टपलाय, एकजूट रहा
हजारो कामगारांची रोजीरोटी वाचवल्याबद्दल कामगारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे ऋण व्यक्त केले. त्यावर, हा पराक्रम कामगार एकजुटीने, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाने केला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ग्राऊंड स्टाफमुळे या विमानांच्या घारी आकाशात उडतात. तशी गिधाडेही असतात. त्यापासून कामगारांचे रक्षण व्हावे अशी शिवसेनेला नेहमीच चिंता असते. त्यामुळे एकजूट रहा; कारण एकदा का एकजूट तुटली तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.