
राज्यातील महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी युवासेनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. युवासेनेच्या या पाठपुराव्याला प्रचंड मोठे यश मिळाले आहे.
मुंबई विद्यापीठाने संलग्नित 229 महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन न केल्यामुळे प्रथम वर्ष प्रवेश करण्यास परवानगी नाकारली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन युवासेना सिनेट सदस्य युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते.
निवेदनात महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. पाहिजे असल्यास इतर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करावी परंतु प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, अशी मागणी केली होती. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाला प्रवेशाला स्थगिती देण्याचे आदेश तूर्त मागे घेण्याचे निर्देश दिले. युवासेनेच्या मागणीला मिळालेले हे प्रचंड मोठे यश असून हजारो विद्यार्थ्यांना युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे.