
सध्याच्या घडीला बाॅलीवुडमध्ये ‘हेरा फेरी-3’ या चित्रपटावरुन चाललेला वाद चांगलाच गाजत आहे. परेश रावल यांनी चित्रपटातून घेतलेली एक्झिटमुळे चांगलाच वादंग निर्माण झालेला आहे. परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ मध्येच सोडून सर्वांनाच धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आणि कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षय कुमारने त्याच्या केप ऑफ गुड फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून, परेश रावल यांना नोटीस पाठवली होती. दरम्यान ‘केप ऑफ गुड फिल्म्स’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या, वकिलाने म्हटले आहे की परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे आणि त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होतील.
प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून ‘हेरा फेरी 3’ ची वाट पाहत होते. ‘हेरा फेरी 3’ ची घोषणा झाल्यानंतर, पुन्हा एकदा चाहते अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यामुळे चाहते खूप निराश झाले आहेत. एका वृत्तानुसार, अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर गैर-व्यावसायिक असल्याचा आरोप केला आहे. असे म्हटले जात आहे की, अभिनेत्याने करारावर स्वाक्षरी केली होती. आगाऊ फी घेतली गेली होती आणि शूटिंगही सुरू झाले होते. त्याने चित्रपट अर्ध्यावर सोडल्यामुळे, प्रॉडक्शन हाऊसला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे.
अक्षयच्या कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, परिणम लॉ असोसिएट्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय भागीदार पूजा तिडार्के यांनी पीटीआयला सांगितले की, “मला वाटते की याचे गंभीर कायदेशीर परिणाम होतील. यामुळे चित्रपटाचे निश्चितच नुकसान होईल. आम्ही परेश रावल यांना नोटीस पाठवली आहे तसेच या घटनेचे कायदेशीर परीणाम काय होतील हेही नमूद केले आहे. पूजा यांनी म्हटले की, परेश रावल यांनी जानेवारीमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘हेरा फेरी 3’ चा भाग असल्याचे स्पष्ट केले होते.
खरं तर चित्रपटाचे सुमारे साडेतीन मिनिटे चित्रीकरण झाले होते. अचानक काही दिवसांपूर्वी आम्हाला परेशजींकडून एक नोटीस मिळाली. यात त्यांनी म्हटले होते की, त्यांना आता हा चित्रपट करण्यात रस नाही. त्यामुळे, हे निश्चितच सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते. पूजा म्हणाली की, करारातून माघार घेतल्याने चित्रपटाचे गंभीर नुकसान होईल. परेश रावल यांनी अद्याप कायदेशीर नोटीसला उत्तर दिलेले नाही. अक्षयच्या वकिलांनी सांगितले की त्यांनी परेश रावल यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.