Vaishnavi Hagavane case – राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे या दोघा आरोपींना शिवाजी नगर न्यायालयाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पहाटे तळेगाव येथून हगवणे पिता-पुत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या विनंतीवरुन न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सासरच्या आणि पतीच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली होती. तिघांनाही 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. मात्र सासरा राजेंद्र आणि दीर सुशील फरार होते.

पोलिसांची सहा पथकं फरार हगवणे पिता-पुत्रांचा गेल्या आठ दिवसांपासून शोध घेत होती. अखेर स्वारगेट परिसरातून शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी फरार हगवणे पिता-पुत्रांच्या मुसक्या आवळल्या.