
दुर्गेश सुखठणकर आणि त्यांच्या टीमचा ‘शाश्वत’ चित्रपट सध्या भारतभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांची लयलूट करीत आहे. हा चित्रपट सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता; परंतु त्याच्या प्रभावी कथानकामुळे आणि सादरीकरणामुळे तो अनेक महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवत आहे.
दुर्गेश सुखठणकर यांच्या या वाटचालीला अपूर्वा वैद्य आणि निधी वैद्य यांचे पाठबळ लाभले. अपूर्वा वैद्य यांनी ‘शाश्वत’ या चित्रपटाची निर्मिती केली. या प्रवासात दुर्गेश यांचे मित्र संतोष जुवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘छावा’ चित्रपटाच्या व्यस्त वेळापत्रकातही ‘शाश्वत’मध्ये प्रमुख भूमिका साकारली. ‘ई-दृश्यम एंटरटेन्मेंट अॅण्ड फिल्म स्कूल’ हा अपूर्वा वैद्य, संतोष जुवेकर आणि दुर्गेश सुखठणकर यांचा स्वप्नवत उपक्रम आहे, याच संस्थेने ‘शाश्वत’ बनवला आहे. दुर्गेश सुखटणकर यांनी मागील दोन दशकांपासून सिने आणि दूरदर्शन क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे. आज ते आघाडीचे दिग्दर्शक आणि संकलक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात संपादन सहाय्यक म्हणून केली आणि नंतर ते शिक्षक झाले, ते पाच वर्षे रहेजा तांत्रिक संस्थेत फिल्म आणि टेलिव्हिजन विभागाचे प्रमुख होते, जिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 2400 विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले. त्यांनी ‘क्षण-स्पर्श मायेचा’ या लघुपटाचे दिग्दर्शन केले, ज्यात अनिकेत विश्वासराव, रेखा कामत आणि विवेक लागू यांनी भूमिका साकारल्या. या चित्रपटाला सचिन पिळगावकर आणि गौतम राजाध्यक्ष यांच्यासारख्या दिग्गजांकडून प्रशंसा मिळाली. यानंतर दुर्गेश यांनी ‘आजी’ या शीर्षकाने याच विषयावर आधारित फीचर फिल्म दिग्दर्शित केली, या चित्रपटाचे संगीत अशोक पत्की आणि नीलेश मोहरीर यांनी दिले होते. गायक म्हणून सोनू निगम, शान, नेहा राजपाल आणि मधुरा पुंभार यांचा सहभाग होता. अर्थात, दुर्गेश यांचा हा प्रवास सोपा नव्हता, परंतु त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते पुढे जात राहिले. आताही त्यांच्या ‘शाश्वत’ चित्रपटाला मिळणारी प्रशंसा त्यांच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे, ज्यामध्ये त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. या टीममध्ये वरिष्ठ छायाचित्रकार शेखर नागरकर, संपादक हर्षद वैती, संगीतकार आर. विशाल, कलाकार धनश्री दामले व बिपिन सुर्वे तसेच निर्मिती टीमचे अक्षत सोलंकी आणि प्रीती शिंदे यांचा समावेश आहे. सुखठणकर आता ‘शाश्वत’ या चित्रपटाच्या फीचर व्हर्जनसाठी सज्ज आहेत आणि लवकरच तो मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
आजपर्यंत ‘शाश्वत’ने पुढील पुरस्कार जिंकले आहेत –
कोल्हापूर कलानगरी फिल्म फेस्टिव्हल, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम कथा, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम अभिनेता, सांस्कृतिक कलादर्पण, ज्युरी पुरस्कार, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम संपादन, आर्यारवी फिल्म फेस्टिव्हल, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री, नवरंग फिल्म फेस्टिव्हल (गुजरात), सर्वोत्तम मराठी लघुपट. ‘शाश्वत’ चित्रपटाची निवड नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हलच्या सर्वोत्तम चित्रपट विभागातही झाली आहे.