
पदोन्नती हा फक्त प्रशासकीय सोपस्कार न राहता, पदोन्नती ही अधिकारी व अमंलदारांसाठी एका प्रेरणास्रोत व्हावी यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी वेगळे पाऊल उचलले आहे. पदोन्नती आदेश जारी झाल्यानंतर लगेच येणाऱया 1 तारखेस सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकारी व अमंलदारांचा ‘पदोन्नती समारंभ’आयोजित करून त्यांचा उचित सन्मान करावा असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
कर्तव्य बजावणाऱया प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱयांसाठी पदोन्नती ही फार महत्त्वाची आणि जबाबदारीची बाब असते. आतापर्यंत अनेकांना पदोन्नती मिळाली होती, पण यापुढे मुंबई पोलीस दलात पदोन्नतीचा आदेश जारी करणे एवढय़ापुरते सीमित राहणार नाही. तर तसा आदेश जारी झाल्यांनंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱयांना सन्मानपूर्वक पदोन्नती देण्याची आगळीवेगळी व प्रोत्साहन देणारी बाब सुरू करण्यास पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आदेश दिले.
पदोन्नतीचा आदेश पारित झाल्यानंतर येणाऱया 1 तारखेला पदोन्नती मिळाली त्या अंमलदारांचा ‘पदोन्नती समारंभ’ आयोजित करावा. जर 1 तारखेला रविवार अथवा इतर शासकीय सुट्टी असल्यास हा समारंभ त्याच आठवडय़ातील सोमवारी घेण्यात यावा असे स्पष्ट आदेश सर्व अपर पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. शिवाय उपनिरीक्षक ते सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नतीप्राप्त अधिकाऱयांचादेखील त्याच पद्धतीने सन्मान करावा, अशा सूचना सर्व सहआयुक्तांना देण्यात आल्या आहेत.