
>> श्रीकांत आंब्रे
मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची खडान्खडा माहिती असणारे धाडसी गुन्हेगारी वार्ताहर, पत्रकार, छायाचित्रकार, ‘ई टीव्ही मराठी’वर गाजलेल्या ‘क्राईम डायरी’ या दैनंदिन मालिकेचे लेखक अजय ताम्हणे यांची ‘मुंबई गँगवॉर’ (कालखंड पहिला) ही कादंबरी व ‘सावज’ (पोलीस आणि गुन्हेगारीचा लपंडाव) हा कथासंग्रह ही दोन पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली आहेत. ‘मुंबई गँगवॉर’ या कादंबरीत त्यांनी मुंबईत हैदोस घालणाऱया गुंडांच्या टोळ्यांमधील गँगवॉरसह अनेक अनैतिक आणि काळय़ा धंद्यांनी माखलेल्या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचे वास्तव दर्शन घडविले आहे. तर ‘सावज’ या कथासंग्रहात पोलीस आणि गुन्हेगारांच्या एकमेकांना चकवणाऱया लपंडावांच्या रंजक आणि उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱया सत्यघटनांवरील कथा सादर केल्या आहेत. साप्ताहिक ‘मार्मिक’मधून गुन्हेगारी जगताविषयीच्या आपल्या अनुभवावर आधारित लेखनातून त्यांनी अंडरवर्ल्डविषयक लेखनाला प्रारंभ केला आणि सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, कसदार लेखनशैलीमुळे गुन्हेगारी जगातील गुन्हेगारीची पोलखोल करत राहिले. गुन्हेगारीची पाळेमुळे गुंडांपासून राजकारण्यांपर्यंत किती खोलवर रुतली आहेत याची जाणीव त्यांच्या या कादंबरी आणि कथासंग्रहातून प्रकर्षाने होते. ‘मुंबई गँगवॉर’ या कादंबरीत मुंबईने पाहिलेल्या, मुंबईवर राज्य करणाऱया भाई लोकांची, त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची, त्यातून निर्माण झालेल्या टोळ्यांमधील वैमनस्याची, संघर्षाची, खूनबाजीची आणि हे सारे थांबवण्यासाठी जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱया अनेक कर्तव्यदक्ष जिगरबाज पोलीस अधिकाऱयांची तसेच त्यांचा लगाम हातात असणाऱया काही भ्रष्ट सत्ताधारी राजकारण्यांची रूपे पाहायला मिळतात. मुंबईत चालणारे सोन्या-चांदीचे स्मगलिंग, पाकीटमारी, सिनेमा तिकिटांचा काळाबाजार, मटका-जुगार, बोकाळलेला वेश्याव्यवसाय, हातभट्टय़ा, चरस-गांजाचे अड्डे अशा या काळ्या विश्वाच्या अनेक थरारक बाजूंचे कप्पे या कादंबरीत उघडे पडतात. तसेच या आसपासच्या गुन्हेगारी जगात आपण असुरक्षित आहोत या जाणिवेने भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची व्यथा अस्वस्थ करून सोडते. जगण्यासाठी आडमार्गाने खूप पैसा कमावण्यासाठी वाकडी पावलेच टाकावी लागतात या समजुतीने काळा धंदा कसा उभा राहतो आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची एकदा का सवय लागली की, त्यातून कशी सुटका होत नाही या चक्रव्यूहाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत प्रत्ययास येते.
पोलीस आणि गुन्हेगारीचा लपंडाव रेखाटणारा ‘सावज’ हा लेखकाचा कथासंग्रहही ‘मुंबई गँगवार’ इतकाच प्रभावी आहे. यातील आठही कथा सत्यघटनांवर आधारित आहेत. कानाकोपऱयातील खेडय़ापाडय़ांतून शहरांपर्यंत दररोज शेकडो गुन्हे घडत असतात. आजच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाइलच्या युगात पकडले जाऊ नये म्हणून गुन्हेगार अत्यंत सावधगिरीने गुन्हा करतो. मात्र पोलीस अत्यंत हुशारीने तपास करून गुन्हेगाराला शोधून काढत गुन्हेगाराची तसेच गुह्याची शिताफीने उकल करतात. पोलीस गुन्हेगारीचा तपास कसा करतात? गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी तसेच मानसिकता काय असते? अशा अनेक गोष्टींची उकल या कथासंग्रहात होते. गुन्हेगारी विश्वाचा धांडोळा घेऊन तो कथारूपातून प्रभावीपणे साकार करताना लेखक अजय ताम्हणे यांचा या विषयाचा दांडगा अभ्यास, विपुल अनुभव, सजग वृत्ती, भाषेवरील प्रभुत्व, नाटय़पूर्ण मोजक्या संवादांतून, साध्या वर्णनशैलीतून प्रत्येक प्रसंग रंगवण्याची हातोटी यामुळे कथा प्रभावी होतात.
मुंबई गँगवॉर (कादंबरी – कालखंड पहिला)
लेखक ः अजय ताम्हणे
प्रकाशक ः रोहन प्रकाशन
पृष्ठे ः 212, n मूल्य ः रुपये 295/-
सावज (कथासंग्रह)
लेखक ः अजय ताम्हणे
प्रकाशक ः नावीन्य प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 167, n मूल्य ः रुपये 270/-