
>> डॉ. मुकुंद कुळे
गणपती काय किंवा मारुती काय, एखादं गाव असो वा किल्ला तिथे असतातच ठाण मांडून बसलेले. बरं त्यांची ही ठाणी म्हणजे तरी काय, तर अनेकदा साधी घुमटीच असते. जेमतेम मूर्ती नीट राहील एवढय़ाच उंचीची आणि तेलवात नीट करता येईल एवढय़ाच रुंदीची, पण या दोन्ही देवतांचा आव तर असा असतो की, जणू काही संपूर्ण गावाच्या-किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्यावरच असावी आणि ती नसते असं तरी का म्हणावं? म्हणजे गाव असो वा किल्ला त्यांच्या रक्षणासाठी माणसं असतातच, पण त्यांना मनोबल पुरवण्यासाठी हक्काचं कुणीतरी असावं लागतं म्हणूनच अनेकदा गावागावात आणि किल्ल्या-बुरुजांवर कधी गणपती, तर कधी मारुती या दैवतांची स्थापना केलेली आढळते.
आज गणपती किंवा मारुतीरायाच्या मंदिरांचा जो बडेजाव दिसतो, तो पूर्वीच्या काळी नव्हता. पूर्वी गणपती किंवा मारुती यांची छोटी-मोठी मंदिरं एका टोकालाच असायची. फक्त रोजच्या रोज दिवाबत्ती केली जायची. कारण गणपती आणि मारुतीराया आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत, अशी तेव्हाच्या माणसांची भावना होती. म्हणजेच एकप्रकारे या क्षेत्रपाळ देवता होत्या. गावांच्या किंवा किल्ल्यांच्या राखणदार देवता. तेव्हा गणपती किंवा मारुती यांची प्राचीन व मध्ययुगीन काळात गाव वा किल्ल्यावर स्थापना केली जायची ती राखणदार म्हणूनच. त्यामुळेच या राखणदार असलेल्या देवतामूर्तींचं नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की, आज आपण शहरांतील वा मोठय़ा गावांतील मंदिरांत या देवतांच्या ज्या सुबक-सुंदर नि घडीव मूर्ती बघतो, तशा या मूर्ती नाहीत. या मूर्ती काहीशा अनघड, उग्र आणि प्रेरणास्वरूप असलेल्या दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही अगदी अष्टविनायकांची जी स्थानं आहेत तिथल्या मूर्ती बघा. त्यातल्या बऱयाचशा मूर्ती या तांदळ्यासारख्याच आहेत. तसंच गडावरील मारुतीरायाच्या मूर्तीचं नीट निरीक्षण करा. त्या मारुतीच्या हात जोडून उभ्या असलेल्या मूर्ती नाहीत, त्या उड्डाण किंवा आक्रमणाच्या-युद्धाच्या आवेशात असलेल्या मूर्ती आहेत. कारण या देवतांची निर्मिती एकप्रकारे संरक्षक देवता म्हणूनच झालेली होती. या क्षेत्र राखणाऱया किंवा पाळणाऱया देवता नंतर क्षेत्रपाळ किंवा ग्रामदेवता म्हणून नावारूपाला आलेल्या दिसतात.
आज आपण गणेशोत्सव, संकष्टी, अंगारकी यांसारखे गणपतीशी संबंधित दिवस, सण मोठय़ा उत्साहात साजरे करतो. तसंच हनुमान जयंतीला ग्रामीण भागात मोठमोठे उत्सव होतात किंवा अगदी शहरातही दर शनिवारी नित्यनेमाने मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घेणाऱयांची कमी नाही. म्हणजे एका परीने आज या दोन्ही देवतांचं नागर आणि अनागर दोन्ही समूहांत स्थिरीकरण झालेलं आहे. त्यांचं चांगल्या अर्थाने बस्तान बसलेलं आहे. मात्र आज या देवतांकडे ज्या पद्धतीने हिंदू देवतामंडळातील प्रमुख देवता म्हणून पाहिलं जात आहे, तसं या देवतांचं स्वरूप प्राचीन कालखंड किंवा मध्ययुगीन कालखंडात नव्हतं. तेव्हा या देवता आजच्यासारख्या ‘आराध्य’ किंवा ‘उपास्य’ देवता नव्हत्या, तर सकाम भक्तीच्या देवता होत्या. म्हणजे विशिष्ट हेतूने प्रतिष्ठापना केलेल्या देवता. ज्या सकाम भक्तीतून स्थापना झालेल्या देवता असतात, त्यांना मोठमोठय़ा मंदिरांची आवश्यकता नसते. त्या आपल्या छोटय़ाशा मठीतच आपला आब राखून असतात. गावपातळीवर किंवा गडकोटांवर आपल्याला गणपती किंवा मारुतीच्या ज्या मूर्ती पाहायला मिळतात, त्यांची स्थापना सकाम भक्तीच्या हेतूनेच करण्यात आली. हा हेतू काय तर तू या गावाचं किंवा गडकोटाचं रक्षण कर आणि म्हणूनच या दोन्ही देवता या क्षेत्रपाळ किंवा संरक्षक देवता ठरतात. क्वचित कधी त्या ग्रामदेवताही ठरलेल्या आहेत. अर्थात लोकदेवता, क्षेत्रपाळ देवता आणि ग्रामदेवता यात फार फरक नाही. मात्र वैदिक देवता आणि या लोकदेवता, क्षेत्रपाळ देवता यांत फरक आहे. कारण या दोहोंच्या केवळ उपासनापद्धतीतच फरक आहे असं नाही, तर त्यांच्या निर्मितीच्या मुळाशीच भेद आहे. वैदिकांनी इतर जनांच्या दैवतांना म्हणजेच लोकदेवतांना कायमच दुय्यम, कनिष्ठ मानलेलं आहे.
मात्र कालौघात उच्च वर्गाकडून या दोन्ही देवतांचं सांस्कृतिक उन्नयन झालेलं आहे. त्यामुळेच आज गणपती चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. गणपतीला आद्यपूजेचा मान दिल्याशिवाय कोणत्याही शुभकार्याला सुरुवात होत नाही, तर मारुती हा मुख्यत रामभक्त म्हणून जनमानसात स्थिरावलेला आहे. त्यामुळे कधी काळी या दोन्ही दैवतांचं कूळ नि मूळ एकच असेल याची कुणाला साधी शंकाही येणार नाही. शंका तरी का यावी? एकाचं मुख हत्तीचं आणि दुसऱयाचं वानराचं. मग गणपती आणि मारुती यांच्यात कसलं आलंय साम्य किंवा संबंध, असंच कुणालाही वाटेल. मात्र आता जरी गणपती आणि मारुती यांच्यात किमान दृश्यरूपात काही नातेसंबंध असलेला दिसत नसला तरी अदृश्य रूपांत मात्र हा संबंध अक्षरश हजारो वर्षं राहिलेला आहे. या दोघांचं शरीर जरी मानवी असलं तरी मुख मात्र प्राण्याचं आहे. एकाच्या धडावर हत्तीचं शिर आहे, तर दुसऱयाच्या धडावर वानराचं शिर आहे. अगदी प्राथमिक समाजशास्त्राrय, मानवशास्त्राrय दृष्टिकोनांतून याची उकल करायची तर असं म्हणता येईल की, ज्या गणसमूहांचं कुलचिन्ह (Totem-टोटेम) हत्ती किंवा वानर-मर्कट होतं, त्या समूहातील हे दोघे असावेत आणि कालांतराने ते आपापल्या कर्तृत्वाने आजच्या दैवतरूपापर्यंत पोहोचले असावेत. अर्थात कुणीही व्यक्ती सामान्याची असामान्य होण्यात तिच्या कर्तृत्वाबरोबरच समाजाचाही हात असतो. कारण अनेकदा समाज किंवा समाजाची बौद्धिक अधिसत्ता ज्यांच्या हाती असते तेच एखाद्या व्यक्तीला घडवत वा बिघडवत असतात. गणपती आणि मारुती यांची महत्ता अशीच वर्धिष्णू झालेली आहे. मात्र या दोन्ही देवतांचा हा जो एकूणच स्थित्यंतराचा किंवा अवस्थांतराचा काळ आहे, तो नंतरचा आहे आणि या दोन्ही देवतांची जी विकसनप्रक्रिया आहे, तीदेखील वेगवेगळी आहे. मात्र या दोहोंमधील सगळ्यात महत्त्वाचं साम्य किंवा एकत्व म्हणजे गणपती आणि मारुती दोघेही यक्षकुळातील आहेत!
आता यक्ष म्हणजे कोण? तर भारतीय परंपरेने यक्ष ही एक अतिमानवी योनी मानलेली आहे आणि यक्षांचा उल्लेख कायमच गंधर्व, किन्नर किंवा राक्षसांबरोबर केलेला आहे. वैदिक, पौराणिक देवतांची निर्मिती झाल्यावर तत्कालीन अभिजनवर्गाने राक्षसांना दुष्प्रवृत्तीचं निदर्शक बनवून टाकलं, तर यक्ष, गंधर्व आणि किन्नरांना दुय्यमत्व दिलं. म्हणजे यक्ष, गंधर्व, किन्नर कधीही प्रमुख देव म्हणून गणले गेले नाहीत, ते दुसऱया स्थानावरच राहिले. प्रत्यक्षात वेदपूर्वकालीन लोकमानस लक्षात घेतलं तर असं दिसतं की, आज आपण ज्या देवदेवतांची पूजाअर्चा करतो त्यांच्याही आधी बहुजन लोकमानसाने यक्षांना देव म्हणून स्वीकारलेलं होतं. म्हणूनच पं. महादेवशास्त्राr जोशी संपादित संस्कृतिकोशात म्हटलंय, ‘लोकमानसातील यक्षविषयक कल्पना म्हणजे यक्ष पाऊस पाडतात, अन्न, फळे व वनस्पती यांची समृद्धी करतात, गाव आणि गाई यांचे रक्षण करतात. तसेच रोग, भूतबाधा व वांझपण घालवतात. ते विघ्नकर्ते असतात, तसेच विघ्नहर्तेही असतात.’
म्हणजेच वेदपूर्व आणि वेदकालीन सर्वसामान्य समाजाने यक्षांना आपलं भलंही करतील किंवा वाईटही करतील अशा देवतास्वरूपात स्वीकारलेलं होतं. गंमत म्हणजे गणपतीचं मूळ रूपही याच प्रकारचं आहे. कारण गणपती ही मूळ यक्षदेवताच आहे. गणपतीची पुरातत्त्वीय, दैवतशास्त्राrय किंवा ऐतिहासिक छाननीही अशीच आहे. एखादं गूढ उकलत जावं, तसा गणपतीचा हा प्रवास आकळत जातो आणि तो जसा आकळत जातो, गणपतीच्या विविध प्रतिमा या उत्खननातून हाती लागतात. मग कधी तो गणनायक असतो, कधी तंत्रमार्गी असतो, कधी तो विघ्नहर्ता असतो, तर कधी आजचा सुखकर्ता-दुःखहर्ता!
मारुतीही मूळ अशीच यक्षदेवता. त्यामुळेच संस्कृतिकोशातील यक्षावरील टिपणात मारुतीच्या रूपविशेषांवर भाष्य करण्यात आलंय ते असं, ‘भारतीय लोक मारुतीला महावीर समजतात आणि तो यक्षांचा नियंत्रक असतो. महाराष्ट्रात ‘दास मारुती’ व ‘वीर मारुती’ अशी मारुतीची दोन रूपं प्रसिद्ध आहेत. दास मारुती हा रामापुढे हात जोडून आणि मान वाकवून उभा असतो, तर वीर मारुती हा हात उभारून सदैव युद्धोन्मुख असतो. वीर मारुतीचं हे यक्ष समन्वित रूपच गावोगावी पाहायला मिळतं.’
महत्त्वाचं म्हणजे वैदिकांनी सुरुवातीला ज्या यक्षांना नाकारलं त्या वैदिकांनी यक्षांची लोकप्रियता पाहून नंतरच्या काळात त्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि त्यांचं वैदिकीकरण केलं. म्हणूनच आता जेव्हा आपण वैदिक वा हिंदू देवतामंडळ बघतो, तेव्हा त्या मंडळांत यक्षदेवताही समाविष्ट झालेल्या दिसतात. यासंबंधी प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक म. श्री. माटे यांनी विश्वकोशात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, ‘द्रविड संस्कृतीत ज्या अनेक गोष्टी पूज्य किंवा उपासनीय मानण्यात आल्या होत्या, त्यात हरप्रकारच्या निसर्गदेवता व उपदेवता होत्या. आर्यानी या देवतांचा स्वीकार केला. सर्वात प्राचीन ज्ञात आर्य शिल्पांत, तसेच बौद्ध शिल्पांत त्यांच्या मूर्ती आढळतात अशा देवतांत यक्ष व यक्षी यांचाही समावेश होतो.’
आपल्या मध्ययुगीन इतिहासात या गडकिल्ल्यांना अतिशय महत्त्व आलेलं असलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत स्वराज्यातील किल्ल्यांची डागडुजी करून घेतलेली असली तरी प्रत्यक्षात काही किल्ले इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे किल्ल्यावरील अनेक देवदेवतांची ठाणी ही पूर्वापार आहेत. शिवशाही किंवा पेशवाईत गणपती वा मारुतीची मंदिरं उभी राहिली असं अजिबातच नाही आणि गाव असो वा किल्ला, त्या ठिकाणी गणपती अथवा मारुतीचं ठाणं उभारलेलं दिसतं ते त्या-त्या देवतेच्या ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या काही संस्कृती-विशेषांमुळेच. अर्थात कालौघात काही सांस्कृतिक अवशेष लोप पावतात. उदाहरणार्थ, आज बाह्य लक्षणांवरून तरी मारुती किंवा गणपतीला कुणीही यक्षदेवता म्हणणार नाही. मात्र त्यांचं अंतरंग खरवडत गेलं की, त्यांचं मूळ रूप नक्कीच उघड होईल आणि ते यक्षमहतीनुसार पराक्रमाचं द्योतक असल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक लोककला, साहित्य, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत.)