घोडबंदरवरील लटकलेल्या कामांसाठी 30 मेची डेडलाईन; शिवसेनेच्या दणक्यानंतर आयुक्त सौरभ राव ऑन फिल्ड

पावसाळा तोंडावर आला असतानादेखील ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कामे अर्धवट आहेत. खड्डे बुजवले गेले नाहीत, ड्रेनेज लाईन तसेच कल्व्हर्ट साफसफाईची कामे संथगतीने सुरू आहेत. जागोजागी कचऱ्याची समस्या असून नालेसफाईची कामे 60 टक्केही झाली नाहीत, असा पंचनामा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केल्यानंतर लटकलेल्या कामांसाठी 30 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी ऑन फिल्ड उतरून संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी केली. रखडलेली उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना दिले.

ठाणे शहराचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. या ना त्या कारणासाठी शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, तर काही ठिकाणी निधी अपूर्ण असल्याने कामे संथगतीने सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी नालेसफाईदेखील झालेली नाही. ही सर्व कामे 30 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व यंत्रणेला दिले होते. मात्र या डेडलाईनला अवघा आठवडा शिल्लक असतानादेखील कामे अर्धवट राहिली असल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी बुधवारी पालिका आयुक्तांकडे पुरावे दिले. दरम्यान, आयुक्तांनी शेवटच्या टप्प्यातील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले.