
मलकापूर येथे दोन कोटी रुपयांची रक्कम पकडलेली इर्टिगा कार, कारचालक व त्याचा सहकारी छत्रपती संभाजीनगरातील असल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. रॊकमेबाबत आयकर विभाग, दहशतवाद विरोधी पथक व जीएसटी विभागाला पत्र देऊन कारचालक सतीश भाऊसाहेब हिवराळे (32) आणि त्याचा सहकारी लक्ष्मण मारुती कुबेर (33) यांची चौकशी करून तपासासाठी हजर होण्याच्या अटीवर सोडून देण्यात आल्याचे मलकापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले. दरम्यान, इतकी मोठी रक्कम घेऊन आलेले संशयित हाती आलेले असताना त्यांना सहज सोडून दिल्यामुळे ही रक्कम मलकापुरात का आली याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मलकापूर शहर पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान मलकापुरातील बोदवड नाक्यावरील वानखडे पेट्रोल पंपाजवळ इर्टिगा गाडी (क्र. एमएच 20 जीव्ही 1781) ची तपासणी केली असता कारमध्ये 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपयांची रोकड आढळून आली होती. ही रक्कम जप्त करून खामगाव आयकर विभाग, दहशतवादी विरोधी पथक, जीएसटी विभाग यांना माहिती देऊन ही रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली.