वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते

आधीच अवकाळीने दाणादाण उडालेल्या वसईच्या किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाखा बसला. घोंघावत आलेला प्रचंड वारा आणि त्याच्या जोडीला मुसळधार पाऊस यामुळे अर्नाळा किल्ला परिसरात दाणादाण उडाली. अनेक घरांचे पत्रे, छपरे, कौले उडून गेली. समुद्र खवळल्याने अवघ्या 10 मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. वादळी पावसाच्या तडाख्याने घरांची पडझड होऊन 12 कुटुंबे रस्त्यावर आली असून डोक्यावर वादळी पाऊस आणि डोळ्यात पाणी अशी या गरीब मच्छीमार कुटुंबांची अवस्था झाली आहे.

चार दिवसांपासून वसई, विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. शुक्रवार, शनिवारी अर्नाळा किनारपट्टीला जोराच्या वादळी वाऱ्याने तडाखा दिला. किनाऱ्याजवळच्या घरांना याचा मोठा फटका बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. मंदिराजवळील ध्वज खांबही वाकला. समुद्र खवळल्याने लाटांचे तडाखेही जोराने बसले. याचा 12 घरांना फटका बसला. वसई तहसील विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असल्याची माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.

मुरुडमध्ये शक्ती वादळ धडकले
मुरुड – दक्षिण कोकण किनाऱ्यावर शक्ती वादळ धडकले. मुरुडसह नांदगाव, मजगाव, बोर्ली -मांडला परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले.

मासळी भिजली-कुजली
अर्नाळा किल्लात कोळी बांधवांची 435 घरे आहेत. अवेळी आलेल्या पाऊसाचा फटका सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या शेकडो कोळी बांधवांना बसला. सुकवण्यासाठी ठेवलेली पापलेट, सुरमई, बोंबील, मांदेली भिजून कुजली आणि तिचा अक्षरशः चिखल झाला.