अर्धवटरावांमुळे यंदा भिवंडी तुंबणार, पाऊस पडू लागला तरी नालेसफाई अर्धीच

मान्सून अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना भिवंडी शहरातील अर्ध्या नाल्यांची सफाई झालेली नाही. 50 टक्के नाले गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. नालेसफाई अर्धवट ठेवणाऱ्या अर्धवटराव अधिकाऱ्यांमुळे यंदाही पावसाळ्यात भिवंडी शहर तुंबणार आहे. मुंबई, कोकणसह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उरलेले नालेसफाईचे काम करणे महापालिका प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पालिकेने यंदा उशिरा नालेसफाईचे काम सुरू केले असून त्याचा जोरदार फटका आता शहरवासीयांना पावसाळ्यात सहन करावा लागणार आहे.

शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी विशेष खर्च करून महापालिकेने नालेसफाईला सुरुवात केली आहे. पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समितीअंतर्गत 44 हजार 565 मीटर लांबीचे 135 नाले व मोठी गटार आहेत. या पावसाळापूर्व नालेसफाईसाठी 2 कोटी 27 लाख 97 हजार 136 रुपयांचा निधी मजूर केला आहे. या नालेसफाईसाठी प्रभाग समिती निहाय सहा ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी उशिरा निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नालेसफाईच्या कामास सुरुवात झाली. मात्र मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढल्यामुळे नालेसफाई पूर्ण झालीच नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने यंदा भिवंडीत सखल भागात पाणी तुंबणार आहे.

या भागात पाणी साचणार

शहरात देवाजीनगर, कमला हॉटेल, टोरंट कार्यालय मंगल भवन, कल्याण नाका, भादवड साईबाबा मंदिर, बाला कंपाऊंड, कारिवली रोड म्हाडा कॉलनी, इदगाह झोपडपट्टी, तांडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा कंपाऊंड, देऊनगर, श्रीरंगनगर, पद्मानगर, समरू बाग, बाजारपेठ, मंडई, मंगल बाजार या भागात दरवर्षी पाणी साचते. यंदा नालेसफाई पूर्ण न झाल्याने या भागात पुन्हा पाणी साचणार आहे.

नालेसफाई उशिरा सुरू झाली असली तरी गांभीर्याने ही कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी ठेकेदारांना दिले होते. मात्र संथ गतीने सुरू असलेली कामे आणि ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे अपूर्ण नालेसफाईचा फटका नागरिकांना बसणार आहे.