
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा चिकन नेक कॉरिडॉरचा मुद्दा उपस्थित केला आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशला त्यांच्या दोन चिकन नेकची आठवण करून दिली आणि म्हटले की, हे काॅरिडाॅर खूपच असुरक्षित आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी हिंदुस्थानच्या चिकन नेक कॉरिडॉरबद्दल खोटे दावे केल्यानंतर सरमा यांचे हे विधान आले. 21 मे रोजी चीन दौऱ्यात त्यांनी म्हटले होते की, हिंदुस्थानचा ईशान्य भाग भूपरिवेष्ठित आहे. युनूस यांनी केलेल्या विधानावर हिमंता बिस्वा सरमा यांनी अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये दोन चिकन नेक आहेत. दोन्हीही खूप असुरक्षित आहेत. पहिला मार्ग म्हणजे 80 किमी लांबीचा उत्तर बांगलादेश कॉरिडॉर – दक्षिण दिनाजपूर ते नैऋत्य गारो टेकड्यांपर्यंत. कोणताही अडथळा बांगलादेशचे विभाजन करू शकतो. या ठिकाणी कोणतीही अडचण उद्भवल्यास, संपूर्ण रंगपूर विभाग बांगलादेशच्या उर्वरित भागापासून पूर्णपणे वेगळा होऊ शकतो, असे ते म्हणाले. दुसरा मार्ग म्हणजे दक्षिण त्रिपुरा ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा 28 किमी लांबीचा चितगाव कॉरिडॉर. हिंदुस्थानचा चिकन नेकपेक्षा लहान असलेला हा कॉरिडॉर बांगलादेशच्या राजधानीला जोडणारा एकमेव मार्ग आहे.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, मी फक्त भौगोलिक तथ्ये सादर करत आहे. हिंदुस्थानच्या सिलिगुडी कॉरिडॉरप्रमाणे, आपल्या शेजारील देशातही दोन अरुंद कॉरिडॉर आहेत. सिलिगुडी कॉरिडॉर म्हणून प्रसिद्ध असलेला चिकन नेक ऑफ इंडिया हा सुमारे 22 किमी-35 किमी रुंद जमिनीचा एक अरुंद पट्टी आहे जो ईशान्येकडील प्रदेशाला उर्वरित हिंदुस्थानला जोडतो.