
नॅकचे मूल्यांकन नसल्याने प्रवेश प्रक्रियेतून वगळलेल्या 156 नॅकबाधित महाविद्यालयांना मिळालेला दिलासा अल्पजिवी ठरण्याची शक्यता आहे. या महाविद्यालयांना २७ मेपर्यंत प्रतिज्ञापत्रे विद्यापीठात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र शनिवार-रविवारी स्टॅम्प पेपर विक्री बंद असल्याने आणि कोकणात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे या अटीची पूर्तता करून अवघ्या दोन दिवसांत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे. शिवाय नॅक मूल्यांकनासाठी लागणारे भरमसाट शुल्कही जैसे थेच असल्याने नॅकबाधित महाविद्यालयांना मिळालेला दिलासा अल्पजिवी ठरणार आहे.
मुंबई विद्यापीठाने आधी नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुळात मूल्यांकनाच्या पक्रियेत सुधारणा करण्याकरिता नॅकनेच आपले पोर्टल बंद ठेवले आहे. ही बाब उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर विभागाच्या सूचनेवरून मुंबईसह राज्यातील सर्वच विद्यापीठांनी माघार घेत या महाविद्यालयांना पुन्हा प्रवेश प्रक्रियेत सामील करून घेण्याचा निर्णय 24 मे रोजी जाहीर केला. मुंबई विद्यापीठाने अशा 156 नॅकबाधित महाविद्यालयांना 27 मेपर्यंत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करून देण्याची अट घालत प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे जाहीर केले. मात्र शुक्रवारनंतर शनिवार-रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी आल्याने शपथपत्र कधी द्यायचे, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे.
कॉलेजांच्या हातात सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस आहेत. कोकणात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत दोन-तीन दिवस वीज नाही. तालुक्याचे ठिकाण 25 ते 40 किलोमीटर अंतरावर. अशा स्थितीत सोमवारी स्टॅम्प पेपर मिळवायचा आणि मंगळवारच्या आत मुंबईत विद्यापीठात शपथपत्र कसे द्यायचे, असा प्रश्न आहे.
मूल्यांकनाचे भरमसाट शुल्कही ‘जैसे थे’च
मूल्यांकनाकरिता किमान पाच लाख रुपये शुल्क भरावे लागते. त्यातून इतके पैसे भरून मूल्यांकन मिळेलच असे नाही. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना हा भरमसाट खर्च परवडत नसल्यानेच नॅक मूल्यांकनात ती मागे राहतात. त्यामुळे हे शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.