
प्रसिद्ध कवी दादा मडकईकर यांच्या ‘सुर्गेचो वळेसार’ या मालवणी म्हणी व कवितासंग्रहाचे प्रकाशन 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील पु. ल. देशपांडे साहित्य अकादमी, प्रभादेवी येथे होणार आहे.
कवी गोविंद मधुकर ऊर्फ दादा मडकईकर हे सावंतवाडीचे सुपुत्र असून मालवणी कवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात रमणे आणि त्याचे निरीक्षण करणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या याच छंदातून त्यांची प्रतिभा बहरली आहे. ते आपल्या स्वरचित कवितांना शास्त्रीय रागदारीत चाल लावून सुरेल आवाजात सादर करतात, ज्यामुळे ते रसिकांचे आवडते कवी बनले आहेत. मराठी पाठ्यपुस्तकातील अनेक संस्कारक्षम कवितांना त्यांनी स्वरसाज चढवला आहे. नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या कोजागरी कवी संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी आपल्या कवितांचे वाचन केले आहे.
दादा मडकईकर यांच्या कविता ऐकणे म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणी असते. आता त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील मालवणी म्हणी एकत्रित करून ‘सुर्गेचो वळेसार’ या पुस्तकातून वाचकांसाठी आणल्या आहेत. या पुस्तकात सुमारे 450 म्हणी आणि मालवणी कवितांचा समावेश आहे. पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होईल.