Ratnagiri News – पोलिसांचे काम केबीनमध्ये बसून नाही तर रस्त्यावर! पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या पोलिसांना कानपिचक्या

केबिनमध्ये बसणे हे पोलिसांचे काम नसून प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून पोलिसांनी काम केले पाहिजे. पोलिसांनी जनतेत मिसळले पाहिजे, अशा कानपिचक्या नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलिसांना दिल्या. तसेच एखादी घटना घडली तर मी स्वतः तिथे पोहचणार आहे. यात्रा व उत्सवाच्या बंदोबस्तात मी ही स्वतः रस्त्यावर उतरून काम करणार असेही ते म्हणाले. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत नितीन बगाटे बोलत होते.

मी यापूर्वी सिंधुदुर्गात काम केले आहे. मी मूळचा मराठवाड्यातील आहे, मात्र माझी बदली रत्नागिरीत झाली तेव्हा मला माझ्या घरी आल्यासारखं वाटलं. रत्नागिरी हे माझं दुसरे घर आहे, असेही बगाटे पुढे म्हणाले.

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना तडीपार करणार

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करण्याच्या घटना वाढत आहेत.अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना तडीपार करणार आहे. तसेच अमंलीपदार्थ रॅकेटचा मूळापर्यंत जाऊन तपास करणार आहे. दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत संघटित गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का लावणार असा इशारा नितीन बगाटे यांनी दिला. महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. वाहतूक व्यवस्थेकडेही गांभीर्याने लक्ष देणार असून चित्रविचित्र आवाजाचे सायलेंसर रत्नागिरीत दिसणार नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.