लेख – भाषा : साहित्यासमोरील आव्हाने आणि मसाप

>> मेधा पालकर

आज जागतिकीकरणाच्या रेटय़ात एकूणच भारतीय भाषांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठीही त्याला अपवाद नाही. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी मुंबईत आझाद मैदानावर विविध संस्थांनी केलेल्या आंदोलनात मराठी साहित्य परिषदेचा सहभाग ठळक होता. या आंदोलनाला यशही मिळाले. इतरही काही आव्हाने पेलण्यास महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे समर्थ आहे. संस्थेचा 120वा वर्धापनदिन 26 आणि 27 मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने …

पुण्यातील मळेकर वाडय़ात कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली 1906 मध्ये भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनाच्या समारोपात साहित्यसम्राट न. चिं. केळकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारातून स्थापित झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मागील शतकोत्तर दोन दशकांत मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन व संवर्धनात अनेक परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यातील साहित्य संमेलन ही एक! आतापर्यंत झालेल्या 98 संमेलनांपैकी पहिली 45 संमेलने ही ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ या नावाने या आद्य साहित्य संस्थेने भरवली होती. संमेलनांची अशी दीर्घ व समृद्ध परंपरा केवळ मराठीतच आढळते. आतापर्यंत मराठी वाङ्मयाचा इतिहास जतन करणारे सात खंड प्रकशित करण्याचे व आता काळानुरूप ई-बुक स्वरूपात आणण्याचे मोलाचे काम परिषदेने केले आहे.

आज जागतिकीकरणाच्या रेटय़ात एकूणच भारतीय भाषांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठीही त्याला अपवाद नाही. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी मुंबईत आझाद मैदानावर विविध संस्थांनी केलेल्या आंदोलनात मराठी साहित्य परिषदेचा सहभाग ठळक होता. या आंदोलनाला यशही मिळाले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे, यासाठी लेखक व विधी सल्लागारांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच घेण्यात आल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मराठी भाषकांच्या रास्त मागणीचा पाठपुरावा साहित्य परिषदेने सातत्याने केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ उभी केली. लेखकांच्या बैठका, पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांद्वारे एक लाख पत्रं पाठविण्याचा उपक्रम, हा प्रश्न तडीस लावण्यासाठी आमदार, खासदारांना पत्रव्यवहार, गाठीभेटी याबरोबरच प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही परिषदेने केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता मिळाला आहे, पण त्यासाठीच्या लढय़ाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात साहित्य परिषदेसाठी मानाचे पान असेल. भाषेचा प्रसार व वृद्धीसाठी मराठी भाषेचे वर्ग व परीक्षा परिषद घेत असते.

मराठी भाषा व साहित्यासमोरील नवी आव्हाने, नव्या गरजा याबाबतीत मराठी साहित्य परिषदेचीं विद्यमान कार्यकारिणी जागरूक आहे. मराठी साहित्याचे क्षेत्र विस्तारले आहे. स्त्राr, दलित, ग्रामीण, आदिवासी अशा सकस साहित्य प्रवाहांनी मराठी साहित्य सखोल व समृद्ध होत आहे. लहान लहान गावांतील, खेडय़ांतील लेखकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (उत्तर, पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रातील 16 जिल्हे) लहान गावांत शाखांच्या विस्तारावर भर देण्यात आला आहे. परिषदेतर्फे होणारे शाखा मेळावे, विभागीय साहित्य संमेलनं, युवा साहित्य व नाटय़ संमेलनं, समीक्षा संमेलनं असे उपक्रम आता छोटय़ा गावांतही घेतले जात आहेत. खेडय़ापाडय़ांत विस्तारलेल्या साहित्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवार साहित्य संमेलने घेतली जात आहेत. याशिवाय शाखांना त्यांचे स्वतंत्र उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामी परिषदेच्या कार्यक्षेत्रात साहित्याला पोषक असे उत्साही वातावरण तयार झाले आहे. साहित्य परिषदेच्या सातारा जिह्यातील शाहूपुरी शाखेने कविवर्य बा.सी. मर्ढेकरांच्या मर्ढे या गावी त्यांच्या घराचे नूतनीकरण करून त्याचे स्मारकात रूपांतर केले ही गोष्ट साहित्य रसिकांना सुखावून गेली अलीकडच्या काळात व्याख्याने, साहित्यिकांचे स्मृतिदिन, विविध पारितोषिकांचे वितरण यापुढे जाऊन साहित्यिक व साहित्य रसिक यांच्यात संवाद साधणारा ‘म.सा.प.गप्पा’, कथेमागची कथा उलगडणारा ‘कथासुगंध’, शाळाशाळांमध्ये जाऊन राबविण्यात येणारा ‘लेखक तुमच्या भेटीला’, नव्या कवी-कवयित्रींची ओळख करून देणारा ‘एक कवी एक कवयित्री’ असे विविध उपक्रम मराठी साहित्य परिषद राबवीत आहे. काळानुरूप परिषद तंत्रस्नेही बनली आहे. परिषदेचं संकेतस्थळ, फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुप, युनिकोडचा वापर याबरोबरच वा. गो. आपटे ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन, परिषदेचे मुखपत्र असलेल्या साहित्य पत्रिकेचे ई-बुक रूपात प्रकाशन अशी त्याची उदाहरणे आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या साहित्य परिषदेच्या मुखपत्रात गेल्या शंभर वर्षांत प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संकलन असलेला ‘अक्षरधन’ हा मौलिक ग्रंथ साहित्य परिषदेने गेल्याच वर्षी प्रकाशित केला आहे. भाषेच्या आणि साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांनी त्याचे संपादन केले आहे. हा ग्रंथ साहित्य रसिकांसाठी आणि संशोधकांसाठी अनमोल ठेवाच आहे.

परिषदेच्या कार्यकारी मंडळाची अगदी अलीकडची कामगिरी म्हणजे परिषदेच्या वास्तूचं अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त करण्यात आलेलं नूतनीकरण! वातानुकूलित, बाहेरच्या ध्वनींपासून संरक्षित, आरामदायी आसन व्यवस्थेने सज्ज सभागृह, कार्यालयाचं बदललेलं आधुनिक रूप, सर्व सोयींनी युक्त बैठक कक्ष, स्थानिक कार्यवाहांसाठी स्वतंत्र कक्ष, संदर्भ ग्रंथालयाचं नूतनीकरण, अभ्यासिका. ‘‘बौद्धिक कामाबरोबरच परिषदेच्या भौतिक विकासाचे हे कामही महत्त्वाचे होते’’’ हे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी का म्हणतात, हे या नव्या रूपातील वास्तूला भेट दिल्यानंतर सहज पटते. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख तसेच दुबईस्थित उद्योगपती विनोद जाधव अशा दानशूरांच्या भरीव अर्थसहाय्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

10 एप्रिलपासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. 99,100 आणि 101 अशी तीन ऐतिहासिक साहित्य संमेलने आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. संमेलनाला आलेले साचलेपण दूर करून साहित्याचा प्रवाह अधिक वाहता ठेवण्यासाठी प्रयत्न अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्यासह सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी हे पदाधिकारी नक्कीच करतील.