नागपूर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वाधिकार अनिल देशमुखांकडे

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीबरोबर निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सर्वाधिकार सोपविले आहेत.

राज्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आढावा बैठक रविवारी नागपूरमध्ये पार पडली. या बैठकीत नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सर्वाधिकार अनिल देशमुख यांच्याकडे देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, किशोर गजभीये, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, निरीक्षक मुनाज शेख यांच्यासह शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बूथ कमिट्यांची निर्मिती करून सर्व इच्छुकांनी आपली तयारी सुरू करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले.

किशोर गजभीये प्रदेश उपाध्यक्षपदी

माजी सनदी अधिकारी किशोर गजभीये यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा अनुभव लक्षात घेता अनिल देशमुख व रमेश बंग यांच्या हस्ते किशोर गजभीये यांना उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले.