फडणवीस-मिंधेंच्या ’त्या’ घाईचा मुंबईकरांना मनस्ताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सिप्झ ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम केले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचा सिप्झ ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू केला होता. त्यापाठोपाठ याच महिन्यात 9 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बीकेसी ते वरळी आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. भूमिगत बांधकाम असल्याने सुरक्षा तसेच इतर बाबींची योग्यप्रकारे खबरदारी घेणे अपेक्षित होते. मात्र त्याला दुय्यम स्थान देत अतिघाईने उद्घाटन समारंभ उरकण्यात आला. फडणवीस-मिंधेंच्या त्या घाईचा मनस्ताप मुंबईकरांना पहिल्याच पावसात सहन करावा लागला.

पावसाचे पाणी थेट भुयारी मेट्रोच्या स्थानकामध्ये शिरले. वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले. मेट्रोतून उतरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना जणू तळ्यात उतरल्याचा भास झाला. यावरून प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळ संरक्षक भिंत कोसळल्याने पावसाचे पाणी भुयारी स्थानकात शिरले. स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे मेट्रो प्रशासनाने मान्य केले. पावसाचे पाणी रोखण्यासाठी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते. हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. पहिल्याच पावसाच्या माऱ्याने ती संरक्षक भिंत कोसळल्याने मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधकामाचा निकृष्ट दर्जा उघडकीस आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यानची मेट्रो वाहतूक बंद केली होती.

अर्धवट कामांमुळे पाणी साचले

मुंबई शहर आणि उपनगरांत मेट्रोची अत्यंत धीम्या गतीने कामे सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यातच टाकलेले आहे. काही ठिकाणी मेट्रो पिलर्स खोदताना बाहेर काढलेल्या मातीचे ढिगारे ‘जैसे थे’ आहेत. भुयारी मेट्रोच्या निर्माणाधिन स्थानकांत हीच परिस्थिती आहे. मेट्रोच्या या अर्धवट कामांमुळे सोमवारी सर्वत्र पाणी साचले होते.

21 हजार कोटींचा मेट्रो प्रकल्प 37 हजार कोटींवर

मुंबईतील मेट्रोची कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहेत. परंतु, मेट्रो-3 या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम जलद गतीने मार्गी लागावे, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमआरसीएल) स्थापना केली आहे. मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. मेट्रो-3चे एमएमआरसीएलचे बजेट आधी 21 हजार कोटींचे होते, ते वाढून 37 हजार 276 कोटींवर गेले आहे. यातील 30 हजार कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत.