कळवा, मुंब्रा, दिवावासीयांना ‘टोरंट’चा ‘शॉक’; पाच लाख रहिवाशांच्या नशिबी रोजच अंधारयात्रा

महावितरणची गच्छंती करून वीजपुरवठ्याचा सगळा कारभार हाती घेतलेल्या टोरंट पॉवर कंपनीने मनमानी कारभार करत कळवा, मुंब्रा, दिवावासीयांना 440 व्होल्टचा ‘शॉक’ दिला आहे. एकीकडे तिप्पट-चौपट बिल आकारणी करून टोरंटने कळवा, मुंब्रा, दिवावासीयांना पिडले असतानाच रोज किमान दहा, पंधरा वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे येथील पाच लाख रहिवाशांच्या नशिबी रोजच अंधारयात्रा आली आहे. विजेच्या लपंडावामुळे महागड्या उपकरणांची वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याने कळवा, मुंब्रा, दिवावासीयांचे बजेटच कोलमडून गेले आहे.

कळव्याची लोकसंख्या 2 लाख 32 हजार, मुंब्याची लोकसंख्या 2 लाख 45 हजार तर दिव्याची लोकसंख्या 1 लाख 25 हजार इतकी आहे. 2017 पूर्वी कळवा, मुंब्रा आणि दिवावासीयांना महावितरण कंपनीमार्फत वीजपुरवठा होत असे. २०१७ नंतर ‘अदृश्य’ राजकीय हातांचा आधार घेत टोरंट पॉवर कंपनीने या तीन शहरात काही ठिकाणी महावितरणला हद्दपार करून आपले बस्तान मांडले. त्यानंतरच येथील लाखो रहिवाशांची पिळवणूक होऊ लागली. अवाचेसवा बिलांनी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. त्याविरोधात अनेकवेळा टोरंट कंपनीवर मोर्चे निघाले. परंतु कंपनीच्या निगरगट्ट व्यवस्थापनाने त्यांना दाद दिली नाही.

टोरंट कंपनीच्या बेफिकीर कारभारामुळे कळवा, मुंब्रा, दिवावासीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने फ्रीज, पंखे, टीव्ही, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रे यांसारख्या महागड्या उपकरणांचे प्रचंड नुकसान होत आहे. रुग्णालये, शाळा, कार्यालये येथील अत्यंत महत्त्वाचे तास वाया जात आहेत. पाणीपुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम होत आहे.

शिवसेनेची धडक
टोरंट कंपनीच्या बेबंदशाहीचा फटका बसत असल्याने दिवावासीयांच्या समस्येची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गंभीर दखल घेतली. शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख रोहिदास मुंडे यांच्यासह शिष्टमंडळाने टोरंट पॉवर कंपनीवर धडक दिली. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन टोरंटने सेवेतील दोष दूर करावेत. तांत्रिक दुरुस्त्या कराव्यात आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली. जनतेला गृहित धराल तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी दिवा शहर महिला संघटक ज्योती पाटील, शहर युवाधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक प्रवीण उतेकर, विभागप्रमुख राज रसाळ, उपविभागप्रमुख संदीप राऊत, गजानन शेलार, तसेच टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी पांचाळ आणि संघर्षण खोब्रागडे उपस्थित होते.