ते सहा दहशतवादी आकाशात गेले की जमिनीत? की भाजपात सामिल झाले, संजय राऊत यांचा खरमरीत सवाल

ज्या सहा दहशतवाद्यांनी आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले ते गेले कुठे? आकाशात गेले की जमिनीत गेले की भाजपात गेले आहेत? असा खरमरीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना “पहलगाम हल्ला हा गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे झाला असून त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी केली आहे.

”मी ऑपरेशन सिंदूरवर कधीही टीका केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर आमच्या देशाच्या लष्कराच्या पराक्रमाचाी गाथा आहे. त्यावरून जे राजनिती करतायत ते फेल झालेयत. मी सर्वपक्षीय बैठकीतही सांगितले होते की त्या सहा दहशतवाद्यांना पकडून दिल्लीत आणून त्यांची ओळख पटवून इंडिया गेटसमोर त्यांचे एनकाऊंटर करा तेव्हा ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल. यावरून भाजपला मिरची लागायची गरज नाही. ऑपरेशन सिंदूरवरून जे राजकारण करतायत त्यावरून लोकांमध्ये भ्रम निर्माण झालाय. काहीतरी चुकीचं झालंय. ते लपवण्यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. तुम्ही आम्हाला सांगितलं की राजकारण करू नका. विरोधकांनी ते ऐकलं. आम्ही राजकारण नाही केलं. पण राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करत आहेत. माझी मागणी आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण जे 26 लोकं मारले गेले ते गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे ते त्यांचे अपयश आहे. त्यामुळे आपल्याला ऑपरेशन सिंदूर करावं लागलं. त्यामुळे हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी ना. कुठे गेले ते दहशतवादी, आकाशात गेले की जमिनीत गेले की भाजपात गेले? सगळ्या प्रकारचे लोकं भाजपात जातायत. मग काय तुम्ही लपवलय का त्यांना? त्यासाठी सर्व विरोधकांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला हवा. राहुल गांधी, खरगेजींना राजीनामा मागितला पाहिजे. आम्ही सरकारचे समर्थन केले आहे. गृहमंत्र्यांनी जो घोटाळा केलाय त्याचे समर्थन शिवसेना कधीही करणार नाही. तुमच्यामुळे आमच्या 26 माता भगिनींचे कुंकू पुसले गेले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.