
‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात हिंदुस्थानी सैन्याने आज महत्त्वाची माहिती दिली. बीएसएफच्या महिलांनी फॉरवर्ड डय़ुटी पोस्टवर लढा देऊन गौरवास्पद कामगिरी केली अशा एका चौकीला ‘सिंदूर’ हे नाव देण्यात येणार असल्याचे लष्कराने सांगितले. पाकिस्तानच्या गोळीबारात हिंदुस्थानचे जवानही शहीद झाले. बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे सब-इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि लष्कराचे नाईक सुनील कुमार हे शहीद झाले. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना आमच्या शहीद झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला ‘सिंदूर’ हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे बीएसएफचे जम्मूचे पोलीस संचालक शशांक आनंद यांनी सांगितले.
बीएसएफच्या महिला कर्मचाऱयांनी फॉरवर्ड डय़ुटी पोस्टवर लढा दिल्याचेही शशांक आनंद यांनी सांगितले. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी पोस्ट सांभाळल्या. आम्ही 70 हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पॅडना लक्ष्य केले व त्यांचे नुकसान केले. या वेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्वदेखील केले.
अधिक सर्तकता आवश्यक
‘‘दहशतवाद्यांच्या लाँच पॅडमध्ये, कॅम्पमध्ये व एलओसीवरील घुसखोरीची आम्हाला माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला सर्तक रहावे लागेल,’’ असे शशांक आनंद म्हणाले.
चोख प्रत्युत्तर
बीएसएफ आरएस पुरा सेक्टरचे डीआयजी चित्र पाल यांनी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर या भागात केलेल्या प्रत्युत्तराबद्दल सांगितले. ‘‘9 मे रोजी पाकिस्तानने आमच्या अनेक चौक्यांना आणि अब्दुलियन गावालादेखील लक्ष्य केले. आमच्या बीएसएफ जवानांनी त्यांना योग्य उत्तर दिले. बीसएसएफने दहशतवादी लाँच पॅड मस्तपूरला लक्ष्य केले आणि नष्ट केले,’’ असे पाल म्हणाले.