
मुंबईत पावसामुळे सोमवारी जो महापूर आला त्याची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पालिकाही सरकारच्याच ताब्यात असल्याने काल अनेकांच्या स्वप्नात आनंद दिघे गेले आणि म्हणाले… कुठे आहे तो एकनाथ? मुंबई, ठाणे बुडलेय… एकनाथ कुठे आहे? एकनाथ त्यावेळी अमित शहांचे, महाराष्ट्रद्रोह्यांचे लांगूलचालन करत होते, अशी चपराक शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी लगावली. मुंबई मेट्रोच्या कामात हजारो कोटींचा टेंडर घोटाळा झाला. त्या पैशातून शिवसेना फोडण्याचे आणि नगरसेवक विकत घेण्याचे कारस्थान सुरू आहे. जनतेच्या पैशातून ही सर्व लूट सुरू आहे. गेल्या चार वर्षांत मुंबईत 35 हजार कोटींची कमिशनबाजी झाली आहे या भ्रष्टाचारामुळेच मुंबई बुडाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.