
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इलेक्शन मोडवर गेले असून ते 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या दौऱयावर जाणार आहेत. दोन दिवसांत चार राज्यांतील हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, चार राज्यांपैकी बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 मध्ये तर पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे 2026 मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांवर विकास प्रकल्पांच्या कामांची खैरात करण्यात येत असल्याची चर्चा असून यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
मोदींचा दौरा 29 मे रोजी सकाळी 11 वाजता सिक्कीम येथून सुरू होणार आहे. 1 हजार 10 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील अलीद्वारपूर आणि कुचबिहार जिह्यातील अडीच लाखांहून अधिक घरांना पाइपगॅस कनेक्शन आणि 100 हून अधिक व्यावसायिक युनिट्स तसेच 19 सीएनजी स्टेशनद्वारे वाहनांना स्वच्छ इंधन पुरवण्यात येणार आहे. बिहारच्या पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.


























































