मुंबईतील 1385 रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार, काँक्रिटीकरणामुळे 5 जूनपासून धावणार वाहने

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाअंतर्गत खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे 2 जूनपर्यंत काँक्रिट क्युरिंग पूर्ण करून 5 जूनपर्यंत रस्त्यावरील सर्व बॅरिकेट्स हटवले जाणार आहेत. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीला खुले होणार आहेत. याबाबते निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाअंतर्गत पूर्व उपनगरात पूर्णत्वास येत असलेल्या रस्त्याच्या कामांची अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चेंबूर येथे संत कक्कया मार्ग, साकीविहार रस्ता, घाटकोपर (पश्चिम) येथील सिकोवा औद्योगिक मार्ग, भांडुप (पश्चिम) येथील सुभाष नगर मार्ग, विक्रोळी (पश्चिम) येथील सूर्या नगर मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथील मॅरेथॉन गॅलेक्सी मार्ग आणि बाबा पदमसिंह छेद मार्ग क्रमांक 5 इत्यादींचा त्यात समावेश होता. एपूण 1385 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पैकी 30 रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत.