काय सांगता! फक्त 11 रुपयांत विमान तिकीट, व्हिएतजेट विमान कंपनीची बंपर ऑफर

व्हिएतनाम एअरलाईन विमान कंपनी व्हिएतजेटने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. हिंदुस्थानमधील कोणत्याही शहरातून थेट व्हिएतनामला जाण्यासाठी एकेरी मार्गाचे इकोनॉमी क्लासचे तिकीट केवळ 11 रुपये ठेवले आहे. (टॅक्स आणि शुल्क वेगळे असणार आहे.) या ऑफरअंतर्गत 3 जून 2025 पर्यंत बुकिंग करता येणार आहे. या ऑफरमध्ये मिळणाऱ्या तिकिटाची बुकिंग व्हिएतजेटची अधिकृत वेबसाईट www.vietjetair.com आणि मोबाईल ऍपद्वारे करता येऊ शकते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत तिकीट बुक करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत. हे प्रोमोशनल तिकीट सार्वजनिक सुट्ट्या आणि पिक ट्रव्हल पीरियडला सोडून 1 जुलै 2025 ते 28 मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहे. 2026 च्या सुरुवातीला व्हिएतनामचा दौरा करणाऱ्यांसाठी किंवा सुट्टीत फिरायला जाणाऱ्यांसाठी ही ऑफर खास असणार आहे. हिंदुस्थान आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये व्हिएतजेट आठवड्याला एकूण 78 फ्लाइट्स चालवते.

या फ्लाईट्स दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि कोच्ची येथून थेट व्हिएतनामच्या हनोई, हो ची मिन्ह सिटी, दा नांगसारख्या दक्षिण पूर्व आशिया येथील विमानतळावर पोहोचते. हिंदुस्थानी प्रवासी व्हिएतनामद्वारा बाली, जकार्ता, बीजिंग, शांघाय, ग्वांग झोऊ किंवा ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या प्रमुख शहरात स्वस्तातील तिकिटात प्रवास करू शकतील. व्हिएतजेट विमान कंपनीच्या स्वस्त तिकिटामुळे हिंदुस्थानातील पर्यटकांना व्हिएतनाममधील डा नांग, न्हा ट्रांग आणि फु क्वोकसारख्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येईल.