
बेकायदा पद्धतीने ठाण्याच्या रस्त्यावर वाहने पार्किंग करणे आता महाग पडणार आहे. कारण गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले टोईंग व्हॅन सुरू झाल्यानंतर वाहतूक शाखेची पुन्हा ‘उचलेगिरी’ सुरू होणार आहे. वाहतूक विभागाच्या उपायुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीने आज 20 टोईंग व्हॅनची चाचणी केली असून टोईंग व्हॅनना परवानगी दिली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्याच्या रस्ते, फुटपाथवर बेकायदा पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना टोईंग करणारी यंत्रणा बंद होती. टोईंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि वाहने टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गुंडगिरीचा नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणून ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज टोईंग व्हॅनची चाचणी घेण्यात आली, तर उर्वरित सात टोईंग व्हॅनची लवकरच चाचणी घेऊन एकूण 27 टोईंग व्हॅन रस्त्यावर फिरणार आहेत.
टोईंग करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड
स्टेशन, बाजारपेठा, सर्व्हिस रोड, फुटपाथ यासारख्या ठिकाणी नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांना दणका बसणार आहे. टोईंग व्हॅनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार आहे. त्यासोबतच व्हॅनच्या मागील आणि पुढील बाजूचेदेखील रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्यामुळे वाहने टोईंग करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड होण्यास मदत होणार आहे.