शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल विट्स खरेदी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे आणखी एक वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण पुढे आले आहे. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून त्याने शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेला 21 हजार चौरस मीटर प्लॉट आरक्षण रद्द करून खरेदी केला, असा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत केला. तसेच या जागेत दारूची कंपनी टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री शिरसाट यांच्या पत्नी व मुलाकडे पैसा आला कुठून? असा सवाल करीत या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

रेल्वे स्टेशन येथील हॉटेल विट्स कमी किमतीमध्ये खरेदी करण्याचे प्रकरण अंगलट आल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट हे खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. यानंतर त्यांनी आपले आता या प्रकरणात काही घेणेदेणे नाही, असे वक्तव्यदेखील केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, हा तर असा प्रकार झाला, की लाच स्वीकारायची आणि मग नंतर ती परत करून म्हणायचे, की मी आता पैसे परत केले आहेर. त्यामुळे आता या प्रकरणाशी माझे काही देणेघेणे नाही. असे कसे तुमचे देणेघेणे नाही? हे प्रकरण संपलेले नसून यात चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंत्री शिरसाट यांच्या मुलाने असाच प्रकार एमआयडीसीमध्ये प्लॉट खरेदी करतानाही केला आहे. ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेली जागा एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाला दिली आहे. यासाठी ज्या पार्टनरशिपमध्ये त्यांनी हा अर्ज केला होता, त्यामध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट, पत्नी विजया शिरसाट आणि भावेन अमीन नावाचे मोठे बिल्डर आहेत. प्लॉट खरेदीनंतर अमीन हे पार्टनरशिपमधून बाहेर पडले, असेही जलील म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची आता सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी सीबीआयला माहितीचा मेल पाठवणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

कंपनीसाठी 25 कोटी आले कुठून?

मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 20 लाख आहे. असे असताना, त्यांना 5 कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळू शकते? त्यांनी स्वतःचे भाग भांडवल 25 कोटी रुपये दाखविले कसे? तेव्हा एवढा पैसा मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्नीकडे आला कुठून? असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.