
भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात असल्याचे सांगत तिरुपती मंदिर प्रसाद लाडू वाद प्रकरणातील आरोपींच्या जामिनाला एसआयटीने विरोध केला. लाडू तूप घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) भेसळयुक्त तूप पुरवल्याचा आरोप असलेल्या तीन डेअरींच्या संचालकांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे.
लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राजकारण तापले आणि अखेर या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी केवळ टीडीडीच नव्हे तर कोट्यवधी रुपयांच्या कटाचा भाग असल्याचा दावा एसआयटीचे नेतृत्व करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) केला. त्यामुळे ही केवळ अन्न फसवणूक नसून श्रद्धेचा विश्वासघात असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
साक्षीदारांना धमकावले जात आहे – सीबीआय
संबंधित डेअरीचा टीडीशीशी कोणताही करार नसून त्यांनी तूप पुरवठा करार मिळवण्यासाठी दुसऱ्या एका डेअरीचा वापर केला. कागदपत्रे दुसऱ्या डेअरीच्या नावावर असली तरी प्रत्यक्षात या डेअरीने उत्पादन पुरवले होते, असे आरोप तपास यंत्रणांनी केले आहेत. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला. आरोपीकडे मोठी आर्थिक शक्ती असल्याचा युक्तिवादही करण्यात आला.