
वटपौर्णिमा म्हणजे हिंदुस्थानातील हिंदू स्त्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस असून अवघ्या दोन दिवसांवर हा सण आला आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वाणात आंबा, करवंद, जांभळे यासोबतच फणसाचे गरेही ठेवले जातात. यानिमित्त बाजारात फणसांचीही आवक वाढली आहे. मुंबईसह ठिकठिकाणी रस्त्यावर फणसांच्या राशी पडल्या असून खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी फणसाचे गरे हे महत्वाचे असल्याने महिलावर्ग अख्खे फणसच खरेदी करताना दिसत आहेत. बाजारपेठेत अनेक ठिकाणी हे फणस विक्रेत रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने थाटून बसले आहेत. फणसाचे गरे 100 ते 120 रूपये किलो दराने विकले जात आहेत. तर अख्खा कापा फणस 150 ते 200 रूपये आणि बरका फणस 100 ते 120 रुपये या भावाने विकले जात आहेत.
यंदा वटपौर्णिमेचा सण 10 जून रोजी आला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने महिलावर्गावर पुरुष मंडळीही फणसाची खरेदी करण्यासाठी बाजारात आले आहेत. सुहासिनींच्या वाणात आंबा, करवंद, जांभळे याबरोबरच फणसाचे गरे, केळी अशी फळे ठेवली जातात. त्यामुळे फणस खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.
फणसाचे आरोग्यदायी फायदे –
ऊर्जेचा उत्तम स्रोत – फणसामध्ये कार्बोहायड्रेट आणि साखर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते शरीराला झटपट ऊर्जा पुरवते.
पचनक्रियेस मदत – फणसामध्ये फायबर्स (आहारीय तंतू) भरपूर प्रमाणात असतात, जे बद्धकोष्ठतेवर नियंत्रण ठेवतात व पचनक्रिया सुधारतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो – फणसात व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
हृदयासाठी उपयुक्त – फणसायामध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.
हाडे मजबूत करतो – फणसात कॅल्शियम व मॅग्नेशियम असते, जे हाडे व दात मजबूत ठेवतात.
त्वचेसाठी फायदेशीर – फणसात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला तजेलदार ठेवतात
कर्करोगापासून संरक्षण – फणसामध्ये लिग्निन्स, सॅपोनिन्स व इतर अँटीऑक्सिडंट्स असतात जे कर्करोगाच्या पेशींचा नाश करतात किंवा त्यांना वाढू देत नाहीत.
वजन वाढवण्यासाठी उपयुक्त – वजन वाढवायचे असल्यास फणस खाल्ल्याने फायदा होतो, कारण त्यात उष्मांक (कॅलोरीज) चांगल्या प्रमाणात असतात.
(टीप – फणस गरम प्रकृतीचे आहे, त्यामुळे काही लोकांना ते अधिक प्रमाणात खाल्ल्यास गॅसेस, अपचन किंवा त्वचेवर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणात खाणे फायदेशीर)