देशभरात कोरोनाचे संकट अधिक गडद, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर; 24 तासांत 6 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 6 हजार 133 सक्रिय रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील दोन, कर्नाटकमधील तीन आणि तामीळनाडूमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाने केरळ, गुजरात, राजस्थान, दिल्ली यांना मोठ्या प्रमाणात विळखा घातला असला तरी महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात 18 वर पोहोचली आहे.

देशात जानेवारीपासून कोरोना रुग्ण पुन्हा सापडू लागले असून आतापर्यंत ही संख्या 6 हजार 133 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1 हजार 950 रुग्ण सापडले आहेत. केरळ पाठोपाठ गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

परदेशवारीमुळे केरळमध्ये रुग्ण वाढलेत का?

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र, हे रुग्ण परदेशी प्रवास करून आलेले आहेत की, तिथेच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, हे अजून केरळच्या राज्य सरकारने स्पष्ट केलेले नाही. केरळमध्ये देशात आणि देशाबाहेरूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशवारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 77 रुग्ण

राज्यात दिवसभरात 77 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 16 हजार 750 कोरोना चाचणी करण्यात आल्या असून 1 हजार 439 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 607 जण सक्रिय रुग्ण आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 36 रुग्ण पुण्यात तर मुंबईत 25 सापडले आहेत.

काळजी घ्या, सावध राहा!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काळजी घ्या. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरू नका, पण सावध राहा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने केले आहे.

फुटबॉलपटू नेयमारला कोरोना

ब्राझिलियन फुटबॉलपटू नेयमार यालाही कोरोनाची लागण झाली आहे. नेयमारला गुरुवारपासून कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्याला संघाच्या सर्व प्रकारच्या सरावापासून वेगळे काढण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.