
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील अग्निशमन यंत्रणा चार महिने बंद होती. त्यामुळे एप्रिलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत मॉलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी मॉलने अग्निशमन यंत्रणेचे काम पाहणाऱ्या ‘इनडिन फायर सेफ्टी सिस्टिम’ या पंत्राटदारावर कारवाई करावी, अशी शिफारस अग्निशमन दलाने मुंबई महापालिका आयुक्तांकडे आज सादर केलेल्या अहवालात केली आहे. हा अहवाल पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजूर केला असून त्यानुसार अग्निशमन दलाने पुढील कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये तळघरात असलेल्या क्रोमा शोरूमला 29 एप्रिलला पहाटे चारच्या सुमाराला आग लागली. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे ही आग जास्त भडकली आणि या आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाने आगीला लेव्हल चारची आग जाहीर केली. ‘एनडीआरएफ’च्या पथकालाही मदतीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात वेग आला. तब्बल 21 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत मॉल आणि मॉलमधील गाळय़ांचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते.
अग्निशमन दलाच्या इतर शिफारशी
- अग्निशमन दलाला ही आग भीषण असल्याचे जाहीर करण्यासाठी म्हणजे ती आग लेव्हल-3 आणि 4 अशी जाहीर करण्यासाठी एवढा कालावधी का लागला याचे संबंधित दलाच्या अधिकाऱयांकडून स्पष्टीकरण मागवले जावे.
- मॉलचे स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करावे.