आसीम मुनीर अमेरिकेच्या ‘आर्मी डे’चे पाहुणे, मोदींचे मित्र ट्रम्प यांचे हे काय चाललेय!

 ‘हाऊडी मोदी’ ते ‘नमस्ते ट्रम्प’पर्यंत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळय़ात गळा घालणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना आणखी एक धक्का दिला आहे. हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये तणाव असतानाच अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसीम मुनीर यांना ‘आर्मी डे’चे पाहुणे म्हणून बोलावले आहे. त्यामुळे मोदींचे मित्र ट्रम्प यांचे हे काय चाललेय, असा प्रश्न हिंदुस्थानच्या जनतेला पडला आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच डोनाल्ड ट्रम्प वेगळेच राजकारण करीत असल्याचे उघड होत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला. त्या दाव्यावर मोदींनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे मोदी व ट्रम्प यांच्यातील मैत्रीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याचदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या 250 व्या आर्मी डे परेडसाठी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना निमंत्रण दिले आहे. मुनीर हे 12 जून रोजी अमेरिकेत दाखल होणार असून 14 जूनच्या समारंभात सहभागी होणार आहेत.

मोदींवरच दबाव टाकण्याची चाल?

अमेरिकेने आर्मी डे परेडला जगभरातील लष्करप्रमुखांना निमंत्रित केले आहे. मात्र मुनीर यांना दिलेले निमंत्रण विशेष चर्चेत आहे. मागील काही वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानला चीनचा आश्रित मानून जास्त भाव दिला नाही. मात्र हिंदुस्थानमध्ये पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे पाकिस्तानवर प्रेम उतू गेले आहे. ट्रम्प यांचा नरेंद्र मोदींवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेच्या कुरापती

पाकिस्तान सातत्याने हिंदुस्थानमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला मदत करीत आहे. हिंदुस्थानने विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अब्जावधी डॉलरचे कर्ज दिले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामागेही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या अमेरिकेची भूमिका महत्त्वपूर्ण होती.