
नंग्या तलवारी नाचवत नशेखोर अल्पवयीन मुलांनी उल्हासनगरात मंगळवारी रात्री अक्षरशः धुडगूस घातला. आरोळेपाडा येथील सहा नागरिकांवर हल्ला करून चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली. यानंतर परिसरातील वातावरण तापले होते. आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी संतप्त नागरिकांना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा येथे अल्पवयीन मुलांनी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच सहा नागरिकांवर हल्ला करून गाड्या फोडल्या. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यात एकूण चार मुलांचा सहभाग आहे. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याप्रकरणी दोन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारे दहशत माजवणारे गुंड निर्माण होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस ठाण्यात अधिकचा स्टाफ आणि आशेळेपाडा या ठिकाणी पोलीस चौकी उभारणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
लवकरच पोलीस चौकी उभारणार
पोलीस चौकीच्या अनुषंगाने तिथे जागा पाहणी आणि स्थानिकांच्या मदतीने आम्ही लवकरच पोलीस चौकी उभारणार आहोत. याबाबत वरिष्ठांसोबत चर्चा झालेली आहे असे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले. या घटनेमध्ये जी मुले सहभागी आहेत. त्यांच्यावर जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. या परिसरात जास्तीत जास्त पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांवर कडक नजर पोलिसांची राहणार आहे. आता त्या ठिकाणी कोणतीच अडचण राहणार नाही असेही ते म्हणाले.