
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एडीसी म्हणून इतिहासात पहिल्यांदा एका महिला अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिलेचे नाव यशस्वी सोलंकी असे असून त्या मूळच्या हरयाणाच्या आहेत. त्या लेफ्टनेंट कमांडर म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपतींकडे पाच एडीसी असतात. त्यातील तीन हे लष्करातील, तर प्रत्येक एक-एक अधिकारी हे नौदल आणि हवाई दलातील असतात, परंतु आतापर्यंत एडीसीमध्ये अधिकारी म्हणून महिलांचा समावेश नव्हता. यशस्वी सोलंकी यांच्या रूपाने राष्ट्रपती भवनात पहिल्यांदा महिला अधिकारी मिळाल्या आहेत. पाच एडीसीमध्ये एक महिला असावी, असा विचार राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलून दाखवला. कारण त्या तिन्ही दलाच्या प्रमुख आहेत. यामुळे यशस्वी सोलंकी यांची निवड करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील सैन्य सचिव मेजर जनरल व्ही. परिदा यांनी दिली. यशस्वी सोलंकी या बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलच्या खेळाडू राहिलेल्या आहेत. यशस्वी सोलंकी यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
एडीसीची जबाबदारी कोणती?
राष्ट्रपतींकडे एड-डी-कॅम्प (एडीसी) म्हणून नियुक्ती असलेले अधिकारी राष्ट्रपतींच्या सर्व कार्यक्रमांत त्यांच्यासोबत सहभागी असतात. राष्ट्रपती यांना कोण कोण भेटणार आहे याची माहिती राष्ट्रपतींना देणे, भेटणाऱया व्यक्तीचा संक्षिप्त परिचय करून देणे, तसेच सरकार व लष्करातील वेगवेगळ्या विंगसोबत संवाद साधण्याचे काम एडीसी करत असतात.
प्रत्येक वेळी अपडेट राहवे लागते
‘‘मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की, मला राष्ट्रपती भवनात काम करण्याची संधी मिळेल. माझी पोस्टिंग याआधी हैदराबादमध्ये डिफेन्स प्रोडक्शन विभागात होती. खरं म्हणजे मी टेक्निकल अधिकारी आहे. मला सामान्य ज्ञान तसे कमी होते, परंतु आता मला प्रत्येक गोष्टीत अपडेट राहावे लागते. प्रत्येक मिनिट, सेकंदाला अपडेट रहावे लागते. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला अपडेट राहावे लागते,’’ असे यशस्वी सोलंकी यांनी म्हटले.





























































