
देवनारच्या लोटस जंक्शन येथे आज दुपारी भयंकर अपघात झाला. एका भरधाव डंपरच्या चाकाखाली आल्याने 28 वर्षांच्या तरुणासह त्याच्या तिघा अल्पवयीन पुतण्यांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त लोकांनी घटनास्थळी ठिय्या देत रस्ता जाम केला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून डंपरचालकाला देवनार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नूर मोहम्मद गलेन (28), आर्यन मोहम्मद गलेन (11), मोहम्मद हुसेन खान (11) आणि अब्दूल गनी खान (9) अशी मृतांची नावे आहेत. हे चौघेही साकीनाका येथे राहणारे आहेत. नूर तिघा पुतण्यांना त्याच्या सुझुकी बर्गमन या दुचाकीहून देवनारच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. मात्र घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील लोटस जंक्शन येथे त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्या ठिकाणी ते आले असता डंपर आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. बसची धडक लागल्याने चौघेही डंपरच्या चाकाखाली आले. चाक अंगावरून गेल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
नूर आणि आर्यन यांना तत्काळ राजावाडी तर मोहम्मद आणि अब्दुल यांना शताब्दी इस्पितळात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या चौघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात काही वेळ संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी ठिय्या देत रस्ता जाम करत या घटनेचा निषेध केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी डंपरचालक मैतू याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.