
पद्धतशीर प्लॅन आणि रेकी करून अज्ञात आरोपींनी सोन्याच्या व्यापाऱ्यांना लुटले. मारहाण करून सराफांचे तीन हजार ग्रॅम सोने हिसकावून ते पळाले. ते सटकले, पण मुंबई पोलिसांनी 12 तासांत पाच जणांना पकडून सर्व ऐवज हस्तगत केला.
सोन्याचा व्यवसाय करणारे सराफ गुरुवारी सकाळी त्यांच्या पुतण्यासह तीन हजार ग्रॅम सोने घेऊन लोअर परळच्या दिशेने निघाले होते. नागपाडा परिसरात त्यांना चार अनोळखी लोकांनी अडवले आणि धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हाच संधी साधत आरोपी व्यापाऱ्याकडे असलेले तीन हजार ग्रॅम सोने हिसकावून नेले.
याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस व गुन्हे शाखेची पथके गुह्याचा तपास करू लागले. तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या मदतीने माग काढत नागपाडा पोलिसांनी मंगेश शिंदे, विनायक दळवी आणि आणखी एकाला पकडले. तर गुन्हे शाखेने संतोष जैन आणि अब्दुल हकिम शेख अशा दोघांना पकडले. पाच आरोपींना पकडून त्यांच्याकडून 1500 ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि 1500 ग्रॅम तुटलेले सोन्याचे दागिने असा दोन कोटी 55 लाख किमतीचा ऐवज हस्तगत केला.
कारखान्यात काम करणाऱ्यानेच कट रचला
संतोष जैन हा तक्रारदार सोने व्यापाऱ्याच्या कारखान्यात कामाला होता. त्यानेच मंगेशच्या माध्यमातून अन्य तिघांना एकत्र करून लुटमारीचा कट रचला. आरोपींनी पद्धतशीर कट रचल्यानंतर रेकी करून गुरुवारी सकाळी कांड केले. पण पोलिसांनी वेळीच पाचही जणांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला.