ठरलं तर मग, शुभांशू शुक्ला अंतराळ उड्डाणासाठी सज्ज

हिंदुस्थानच्या हवाई दलाचे पायलट आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात झेप घ्यायला सज्ज झाले आहेत. त्यांची एएक्स-04 मोहीम आता 19 जून रोजी लाँच होणार आहे. ही मोहीम स्पेसेक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित होणार आहे. याआधी ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. फाल्कन 9 रॉकेटमधील लिक्विड ऑक्सिजन गळतीची अडचण सोडवण्यात आल्यानंतर मोहीम लवकरच लाँच होणार आहे.

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे मोजक्या हिंदुस्थानींपैकी एक आहेत. त्यांची झेप देशातील नव्या पिढीला विज्ञान, अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रात करियर घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. म्हणून 19 जून हा महत्त्वाचा दिवस आहे. एएक्स- 04 मोहिमेत शुभांशू यांच्यासह विविध देशांचे अंतराळवीर सहभागी होतील. ही मोहीम ऑक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळ स्थानकाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. शुभांशू अंतराळात काही प्रयोग करतील तसेच नासाच्या संयुक्त प्रयोगांमध्येही सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील दाब प्रणालीतील गळतीवर नासा आणि ऑक्झिओम स्पेस बारीक लक्ष ठेवून आहे.