
मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज दिवसभर पावसाने बॅटिंग केली. पुढील 24 तासांत रत्नागिरी आणि रायगड जिह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून हवामान खात्याने या दोन्ही जिह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिह्यालाही ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात आज सकाळपर्यंत रत्नागिरी जिह्यात सर्वाधिक 88.1 मि. मी. पावसाची नोंद झाली. रायगड जिह्यात 65.3 मिमी, सिंधुदुर्ग जिह्यात 53.8 मिमी, ठाणे 29.6 आणि यवतमाळ जिह्यात 17.5 मिमी पावसाची नोंद झाली.
वीज कोसळून 8 मृत्यू
मुंबईत वादळी वाऱयामुळे एक व्यक्ती जखमी झाली आहे. धुळे व नाशिक जिह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर जिह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. नंदुरबार जिह्यात एक मृत्यू व एक जखमी आणि अमरावती जिह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.