
नागरिकांचा विरोध असतानाही महावितरणकडून कल्याणमध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिकांचा विरोध डावलून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी शिवसैनिकांनी चांगलाच ‘शॉक’ दिला. स्मार्ट मीटरची सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावताच पथकाने पळ काढला.
महावितरणकडून कल्याणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटरला नागरिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला आहे. कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा परिसरातील कैलास होम्स सोसायटीमध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू होते. रहिवाशांनी कर्मचाऱ्यांना विरोध केला. मात्र हा विरोध डावलून कर्मचाऱ्यांनी काम सुरूच ठेवले होते. याबाबत रहिवाशांनी शिवसैनिकांशी संपर्क साधला. यानंतर युवासेनेचे पदाधिकारी गणेश नाईक यांनी शिवसैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली.
कर्मचाऱ्यांची उद्धट वर्तणूक
नागरिकांचा विरोध असताना स्मार्ट मीटर का बसवत आहात, असा गणेश नाईक यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट उत्तरे दिली. यामुळे संतापलेल्या नाईक यांनी एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावत चांगलाच धडा शिकवला. शिवसैनिकांचा रोष पाहून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या पथकाने पळ काढला.