
जोगेश्वरी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या. त्यापैकी एकीची प्रकृती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात बांधकाम करताना जोखीम वाढते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन काम केले पाहिजे. इमारतीचे बांधकाम करताना खबरदारी न घेणाऱ्या, निष्काळजीपणा करणाऱ्या बांधकाम विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार बाळा नर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
जोगेश्वरी (पूर्व) येथील पीपी डाईस पंपाऊंड, नटवरनगर, रोड क्रमांक 1 येथे मे. देवभूमी कन्स्ट्रक्शन या विकासकाकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या. त्यापैकी एकीवर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले तर अर्लीन पॉल या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार बाळा नर यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात जाऊन पॉल यांची विचारपूस केली तसेच पुढील उपचारांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. यावेळी त्यांनी विकासकावर कारवाईची मागणी केली. यावेळी विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, माजी शाखाप्रमुख सुनील शिर्पे, शाखाप्रमुख मंदार मोरे, महिला उपविभाग समन्वयक शीला येरागी, शाखाप्रमुख समीक्षा माळी, व्यापार विभागाचे संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.