लोकलच्या गेटवर बॅग घेऊन उभे राहण्यास मनाई

लोकल ट्रेनच्या गेटवर होणाऱया प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. बॅगधारक प्रवाशांनी गेटवर उभे राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी सायंकाळच्या ‘पीक अवर्स’ला प्रमुख स्थानकांत प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. मुंब्र्यात चार प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर अपघात रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

लोकल ट्रेनना ‘पीक अवर्स’ला मोठी गर्दी होते. अनेक प्रवासी लोकलच्या गेटवर लटकतात. त्यांच्या बॅगा एकमेकांमध्ये अडकून प्रवासी खाली पडण्याचा धोका अधिक असतो. मुंब्रा येथे 9 जून रोजी झालेल्या अपघातामागेही बॅगा घासल्याचे कारण देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाबरोबर आरपीएफ आणि जीआरपीने लोकल ट्रेनच्या गेटवरील गर्दी नियंत्रणासाठी अधिक सतर्कता बाळगली आहे. याअंतर्गत प्रमुख वर्दळीच्या स्थानकांत सायंकाळी ‘पीक अवर्स’ला अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. हे जवान फुटबोर्डवरील गर्दी कमी करणे तसेच बॅगधारक प्रवाशांना गेटवर उभे राहू न देणे आदी खबरदारी घेत आहेत. स्वयंचलित दरवाजे बसवले जाईपर्यंत बॅगधारक प्रवाशांना गेटवर उभे राहण्यास मनाई असेल, असे आरपीएफ अधिकाऱयाने सांगितले. चर्चगेट स्थानकाच्या चार प्लॅटफॉर्मवर सायंकाळी ‘पीक अवर्स’ला आरपीएफ आणि जीआरपीचे एकूण 16 जवान तैनात राहून लोकल ट्रेनच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत.

मुंब्रा येथील रेल्वे अपघातानंतर लोकलच्या गर्दीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने विचारात घेतला आहे. फुटबोर्डवर होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. सुरक्षित प्रवासासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. – सुहास मनोहर, आरपीएफ अधिकारी, सीएसएमटी