
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर व उपनगरातील संक्रमण शिबिरांमध्ये सुरू असलेले बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अजूनही काही रहिवाशी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा आता अॅक्शन मोडवर आले असून बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रतिसाद न देणाऱ्या रहिवाशांना घुसखोर म्हणून घोषित करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशारा म्हाडातर्फे देण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे अ, ब, क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुषंगाने म्हाडामार्फत 10 फेब्रुवारी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी अजूनही काही भाडेकरू, रहिवासी बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रतिसाद दिलेला नाही, असे म्हाडाच्या निदर्शनास आले आहे.
रहिवाशांसाठी आवाहन
संक्रमण शिबिरातील भाडेकरू अथवा रहिवाशांच्या अधिकृत नोंदीसाठी मंडळातर्फे राबविण्यात येत असलेले बायोमेट्रिक सर्वेक्षण आवश्यक असून यामध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही सर्वेक्षणात भाग घेतला नाही अशा रहिवाशांनी याची गंभीर नोंद घ्यावी व तातडीने बायोमेट्रिक सर्व्हे करून घ्यावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
…अन्यथा कारवाई
म्हाडाच्या आवाहनानंतरही जे भाडेकरू अथवा रहिवासी बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नाही किंवा संक्रमण शिबिरात वास्तव्यास असण्यास त्यांना स्वारस्य नाही, असे गृहीत धरले जाईल. अशा रहिवाशांना अधिकृत घुसखोर असे जाहीर करण्याचा इशारा म्हाडातर्फे देण्यात आला आहे.
‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवाशी ज्यांनी मुखत्यार पत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे, तसेच ‘क’ म्हणजे घुसखोर रहिवाशी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा बेकायदेशीपणे ताबा घेतला आहे.