छत्तीसगडमध्ये पंधरा दिवसांत सात नक्षलवाद्यांचा खात्मा

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तब्बल सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात सरकारी शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या एकाचा समावेश असून त्याचे नाव महेश कोडीयाम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दल आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. इंद्रावती नॅशनल पार्क या बिजापूर येथील परिसरात 4 आणि सात जून रोजी सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची शोधमोहीम राबवली. कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांसह पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात दोन टॉप कमांडर्सचाही समावेश आहे.

4 नक्षलवाद्यांना अटक

बिजापूरमध्ये चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यात नक्षसवाद्यांना सहकार्य करणाऱ्या एकाचाही समावेश आहे. पोलिसांनी कमलु उर्फ कलमु (3)0, कोसा भोगम (45) आणि कोसा टामो (45) या नक्षलवाद्यांना अटक केली.

नक्षलवादींना झोपू देणार नाही – अमित शहा

मुसळधार पावसातही नक्षलवाद्यांना झोपू देणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. रायपूर कॅम्पसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कुठल्याही प्रकारच्या चर्चेची गरज नाही. नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून शरण यावे, असे आवाहनही त्यांनी केले.