
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीत 22 मे रोजी 1 कोटी 84 लाख रुपयांची बेकायदा रोकड पोलिसांनी जप्त केली होती. विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी हा पैसा जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेला एक महिना उलटला तरी सरकारने काहीच कारवाई न केल्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने आज धुळे येथे धरणे आंदोलन केले.
गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसह धाड टाकून ही बेकायदा रोकड जप्त केली होती. अंदाज समितीचे अध्यक्ष व मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पीए किशोर पाटील यांनी ती रक्कम आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जुन्या महानगरपालिकेसमोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
एसआयटी आहे कुठे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. ती एसआयटी आहे कुठे, एसआयटी प्रमुखांचे नाव अद्याप जाहीर का झालेले नाही, असा सवाल आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी उपस्थित केला.
अर्जुन खोतकर, किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करा
या प्रकरणाची चौकशी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. केवळ टाईमपास सुरू आहे. हे प्रकरण शासनाला दडपायचे आहे, असा आरोप या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी केला. या प्रकरणात मनी लॉण्डरिंग अँटी करप्शन अॅक्ट, मकोका अशा कायद्यांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले पाहिजे होते असे सांगतानाच अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील यांची नार्को टेस्ट केल्यास सर्व बाहेर येईल, अशी मागणीही परदेशी यांनी केली.