
नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान (सीएसएमटी) धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक 111 च्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. नरिमन पॉइंट ते सीएसएमटी बस मार्ग क्रमांक 111 च्या फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करीत प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
नरिमन पॉइंट परिसरात अनेक सरकारी तसेच खासगी कार्यालये आहेत. तेथील नोकरदार मंडळींची दिवसभराच्या धावपळीच्या कामानंतर सायंकाळी घरी परतताना गैरसोय होत आहे. उपनगरांत राहणाऱ्या हजारो प्रवाशांना अनियमित बस सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फ्री प्रेस हाऊस येथील बस मार्ग क्रमांक 111 च्या सुरुवातीच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. बस थांब्याच्या ठिकाणी योग्य शेड नसल्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडत आहे. संध्याकाळी 5.30 ते 7.30 या गर्दीच्या वेळेत बेस्ट मार्ग क्रमांक 111 ची वारंवारता वाढवण्याची मागणी कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयाकडे केली आहे.