शहाडमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वारास विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याचा राग

विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची घटना शहाड परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे या माथेफिरू दुचाकीस्वाराने पोलीस हवालदारावर दगडही भिरकावला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महात्मा फुले पोलिसांनी त्या माथेफिरू दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपुलाजवळ शनिवारी मध्यरात्री प्रचंड वाहतूककोंडी झाली. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेचे हवालदार सचिन ओमासे तेथे पोहोचले. यावेळी वाहतूक नियंत्रित करत असताना शहाडकडून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेने कल्याणकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हवालदार ओमासे यांनी त्याला रोखले व पुढे वाहतूककोंडी असल्याने विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केला. यावर संतापलेल्या दुचाकीस्वाराने पोलीस हवालदारासोबत हुज्जत घालत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. 15 ते 20 मिनिटे राडा घातल्यानंतर नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. याप्रकरणी ओमासे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.