एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणारच, एव्हीएशन कामगार सेनेच्या मेळाव्यात निर्धार

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा केला जात आहे. कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व्यवस्थापनासोबत पत्रव्यवहार केला जात असून याबाबतची माहिती देण्यासाठी सर्व कामगारांचा मेळावा नुकताच शिवसेना भवन येथे संपन्न झाला. यावेळी हुकुमशाही व्यवस्थापनाला धडा शिकवून कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणारच, असा निर्धार करण्यात आला.

शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार या मेळाव्याचे आयोजन केले होते. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष उल्हास बिले, चिटणीस बाळासाहेब कांबळे, एव्हिएशन कामगार सेनेचे अध्यक्ष प्रशांत सावंत, कार्याध्यक्ष प्रविण शिंदे यांनी कामगारांना यावेळी मार्गदर्शन केले. महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर म्हणाले, की शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करूनही कर्मचाऱ्यांना न्याय दिला जात नाही.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसवर मोर्चा काढला त्यावेळी व्यवस्थापनाने पोलीस उपायुक्तांसमोर व शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार अ‍ॅड. अनिल परब, आमदार सुनील शिंदे यांच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. कामगारांसाठी अ‍ॅम्बुलन्स नाही, कार्गोमधील मग्रूर अधिकारी अन्यायाला विरोध करणाया कामगारांची बदली करून त्रास देतात, कामगाराकडून काही डॅमेज झाले तर त्याच्याकडून पैसे घेतात याकडे मयेकर यांनी लक्ष वेधले. या मेळाव्याला सुरेश शिंदे, गोपी कदम, अजित चव्हाण, सलील कोटकर, अमोल कदम, दिपक शिंदे, भालचंद्र देसाई, लहू खामकर, सुनील नींगावले, सुरेश मेकल, सतीश शेगले, संतोष मोरे, एयर कॉर्पोरेशन एम्प्लॉयीज बँकेचे उपाध्यक्ष उमेश सानप तसेच एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील शेकडो कामगार उपस्थित होते.