
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) गेल्या 45 वर्षांतील आपल्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका आज जारी केली. गेल्या 45 वर्षांतील 37 वर्षे लाल परी तोट्यातच धावतेय. फक्त आठ वर्षेच एसटी महामंडळाला थोडाफार नफा मिळाला, असा दावा त्यात करण्यात आला आहे. एसटीला या कालावधीत उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक झाला असून तोट्याचा आकडा गतवर्षी 2023-24मध्ये 10 हजार 322 कोटी 32 लाखांवर पोहोचला असे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. अनियमित भाडेवाढ, गाड्यांचा तुटवडा, जुन्या गाड्या, वाढलेली अवैध वाहतूक ही तोटा होण्यामागची कारणे असल्याचे सांगितले गेले आहे. मिंधे सरकार आणि त्यानंतर आलेल्या महायुती सरकारच्या काळात एसटीचा हा तोटा वाढत गेल्याचे दिसून येते.
2023-24मध्ये एसटी महामंडळाला 9 हजार 868 कोटी 64 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. परंतु इंधन, गाड्यांचे सुटे भाग, प्रवाशी कर आणि अन्य खर्च मिळून 10 हजार 865 कोटी 99 लाख रुपये खर्च झाला. 2018-19मध्ये एसटी महामंडळाला 4 हजार 603 कोटी 8 लाख रुपये इतका तोटा होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये तोट्यात वाढ होत गेल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद आहे.
सद्यस्थिती एसटीच्या ताफ्यात सध्या 15764 बसेस आहेत. एसटीमध्ये 83317 कर्मचारी काम करतात. राज्यभरात 598 एसटी डेपो आहेत. दरवर्षी 213 कोटी प्रवाशी एसटीमधून प्रवास करतात.
महसूल वाढीसाठी एसटीच्या ताफ्यात दरवर्षी 5 हजार नव्या बसेस सामील करण्याचा महामंडळाचा विचार आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी 5 हजार एलएनजी आणि 10 हजार सीएनजी बसेस आणण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय 5300 इलेक्ट्रीक बसेस आणण्यात येणार आहेत. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने या श्वेतपत्रिकेमध्ये नवीन बसगाड्यांचा समावेश, महामंडळाच्या जागांचा विकास, एस.टी.मध्ये भाडेतत्त्वावरील गाड्यांचा समावेश आदी उपाययोजनाही नमूद करण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळावर हजारो कोटींची देणीही प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी ठेव विमा योजना, प्रवाशी कर, बॅंकांची थकबाकी अशी सुमारे 3 हजार 297 कोटी 65 लाख रुपयांची देणी एसटीला द्यायची आहेत. डिझेल तसेच भांडारातील सामान पुरवणाऱ्या पुरवठदारांचीही 217 कोटी 19 लाख रुपयांची देणी एसटीवर प्रलंबित आहेत. याशिवाय इतर देणी पाहता हा आकडा 3 हजार 514 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.