12 दिवसांच्या लादलेल्या युद्धाचा अंत, इराणच्या राष्ट्रपतींनी केली शस्त्रसंधीची घोषणा

इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी मंगळवारी देशाला उद्देशून एक संदेश जाहीर केला. इस्रायलने लादलेल्या 12 दिवसांच्या युद्धाचा अंत झाला, असं म्हणत त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. हा संदेश इराणच्या अधिकृत वृत्तसंस्था IRNA द्वारे प्रसारित करण्यात आला. या घोषणेमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत युद्धविरामाची आशा निर्माण झाली आहे.

राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी आपल्या संदेशात इराणी जनतेच्या वीरतेचा आणि दृढनिश्चयाचा गौरव केला. ते म्हणाले, “आज आपल्या थोर राष्ट्राच्या अतुलनीय शौर्याने आणि अटल संकल्पाने इतिहासाला नवे पान लिहिले गेले. आपण शांततेचा करार होताना आणि इस्रायलच्या उकसवणाऱ्या कृतींमुळे लादलेल्या या 12 दिवसांच्या युद्धाच्या समाप्तीचे साक्षीदार होत आहोत”

दरम्यान, या शस्त्रसंधीमुळे आता दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा आणि शांततेच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची शक्यता आहे. इराण सरकारने शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाशी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. या घोषणेनंतर इराणी जनतेनेही युद्धाच्या समाप्तीचे स्वागत केले असून, देशात शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.